फक्त लाळ घोटेपणाने बघणाऱ्या पुरुषाची कीव करावी की मुलींनी घातलेल्या तोकड्या कपड्यांची हा गोंधळ होता.
निश्चितच लाळघोटेपणाने बघणाऱ्या पुरुषाची!
आजतागायत अनेकांकडून अनेकांना उद्देशून अगणित वेळा विचारला गेलेला (आणि हिंदी चित्रपटसृष्टीने अजरामर केलेला) 'तुमच्या घरी आयाबहिणी नाहीत का?' हा 'भारतीय संस्कृती'तला 'पारंपारिक' आणि 'सनातन' प्रश्न अशा पुरुषांच्या संदर्भात अतिशय बोलका ठरावा.
(डिस्क्लेमर: वरील विधान हे एक अत्यंत सामान्य विधान आहे. यात कोणाकडेही व्यक्तिगत रोख नाही.)
तुमचं म्हणणं हि बरोबर आहे म्हणा त्यात मी निषेध कोणाचा करणार बघणाऱ्याने बघावं आणि दाखवणाऱ्याने दाखवावं.
मुळात तथाकथित 'दाखवणारे'('ऱ्या'?) हे/या 'दाखवत' आहेत, हे गृहीतक कोणी मांडलं?
एक गोष्ट सांगतो. नुकताच गोव्याला जाऊन आलो. गेलो तो गेलो, पण 'गाइडेड टूर' घेण्याची दुर्बुद्धी झाली - अर्थात सामूहिक परिक्रमणा. जिथेतिथे त्या गाइडचं एकच पालुपद - "इथे बीचवर गोरे लोक कमी कपड्यात सूर्यस्नान / समुद्रस्नान करत असतात. कृपया त्यांचे फोटो घेऊ नका - त्यांना आवडत नाही! फोटो घेतलातच, तर याद राखा, ते लोक काहीही करणार नाहीत, पण सेक्युरिटीवाले चुपचाप येऊन तुमची फिल्म काढून फेकून देतील!" प्रत्येक बीचवर हेच! सर्वात अगोदर त्या गाइडचा राग आला, की हे सारखंसारखं सांगायला हीच आमची लायकी समजतोय की काय म्हणून. (तरी बरं, ग्रूपमध्ये बरेचसे मध्यमवयीन, आपापल्या कुटुंबाबरोबर आलेले आणि मुलंबाळं असलेले लोक होते!) पण मग विचार करता असं लक्षात आलं, की त्या बिचाऱ्याचंही त्याच्या परीनं बरोबरच आहे. इथे त्यानं बऱ्याच 'दिसली कातडी की फुकटचं मनोरंजन / प्रेक्षणीय स्थळ समजणाऱ्या 'उच्च' 'भारतीय संस्कृती'तल्या पुरुषांचा वाईट अनुभव घेतला असणार - तो फुकट आपल्या टूरचे नाव बदनाम होण्याचा / आपल्यावर आफत येण्याचा धोका कशाला पत्करेल? ते गोरे लोक बिचारे आपापला किनाऱ्यावरल्या सूर्यस्नानाचा/समुद्रस्नानाचा आनंद लुटत असतात. आजूबाजूचे भारतीय किंवा इतरदेशीय टूरिस्ट त्यांच्या खिजगणतीतही नसतात - ते 'दाखवताहेत' तेव्हा 'मजा करून घ्या' या आपल्या मानसिकतेला काय म्हणायचं?
आणि कातडी (मग ती गोरी असो किंवा भारतीय) दिसली की चळणं, लाळघोटेपणा करावासा वाटणं, हा स्त्रीचा दोष आहे की पुरुष चळतात, लाळघोटेपणा करतात केवळ म्हणून स्त्रियांना अंगभर कपडे घालण्याची गरज असणं हा भारतीय संस्कृतीचा मोठेपणा आहे?
आणि समजा (जरी मान्य नसलं तरी) अगदी वादासाठी धरायचंच म्हटलं, की 'दाखवणाऱ्या दाखवतात' म्हणून, तरी 'बघणाऱ्या'वर 'बघण्या'चं कोणतंही बंधन नसल्यामुळे, 'बघणाऱ्या'नं जर 'बघितलं', तर त्यासाठी 'बघणाऱ्या'चीच पूर्ण जबाबदारी आहे. एक तर 'बघू' नये, किंवा 'दाखवणाऱ्या दाखवतात' म्हणून किंवा 'संस्कृती बुडाली' म्हणून शंख करू नये.