हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
सर्वसाधारणपणे आपण ज्या कपड्यांत ओंगळ / अजागळ दिसत नाही तो वेष परिधान करण्याची प्रथा*/कल असतो.
लालूप्रसाद यादव ह्यांना धोती-कुडत्यात व शरद पवार ह्यांना विजार - सदरा परिधान केलेले (शर्ट इन न करता) बघण्याची सवय पडलेली असते म्हणून त्यांनी ३ पीस सूट घालून फिरूच नये असे नव्हे. पण पाटणा किंवा बारामतीचे तापमान लक्षात घेतल्यास त्यांचा पोषाख एस्किमो सारखा असावा अशी अपेक्षा करणे चुकीचेच नव्हे तर मूर्ख पणाचे आहे.
सार्वजनिक आयुष्यात वावरताना काही विधिनिषेध पाळावे लागतात व ते पाळणे कधी भागही पडते. मी नोकरीत असताना एकदा जीन्स व भडक रंगाचा टी शर्ट घालून सकाळी सकाळी हापीसात गेलो. माझ्या सर्व्हिस मॅनेजरने घरी जाऊन कपडे बदलून परत ये किंवा आजची रजा टाक असा निर्वाणीचा हेका धरला. तो दिवस पार पडल्यावर त्याने समजावले की, 'जेथे ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करायच्या असतात तेथे आपल्या पोषाखावरून आपला कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो' हे कितपत सत्य व योग्य आहे ते सांगणे कठीण आहे तरीही नंतर फॉर्मल कपडे घालूनच ऑफिसला जाण्याची सवय अंगवळणी पडली. टाय (कंठलंगोट) रोज नाही परंतु 'कॉन्फ़रन्सेस' ना तरी बांघून जावेच लागते !
त्याकाळी माझा सर्व्हिस मॅनेजर माझ्या आजच्या वयाइतका असावा व मी तरुण वर्गात होतो. आज जर माझा सबॉर्डिनेट असे कपडे घालून आल्यास त्याला घरी नाही पाठवला तरी माझ्या कपाळावर आठ्या नक्कीच चढतील कारण काही सवयी अंगवळणी पडतात (म्हणून कोल्हापुरी चप्पल व कुडता पायजमा घालून तुम्ही डॉक्टर कडे इंडोस्कोप विकायला/दुरुस्त करायला जाऊच शकणार नाहीत !)
ह्याच धर्तीवर जर स्त्रियांनी उष्ण वातावरणात अघळपघळ/सुटसुटीत सलवार कुडता घातल्यास हरकत काय ? मुंबईसारख्या ठिकाणी धावपळीचे आयुष्य जगताना जीन्स व टॉप ला पर्याय नाही. परंतु ६० ची कंबर असलेल्या स्त्रीने जर जीन्स व टॉप घातल्यास ते दिसायला (संस्कृती रक्षक व विरोधक - दिसण्याची गोष्ट करतोय; संस्कृतीची नाही !) अजागळ दिसेल. त्यातही ज्या स्त्रीचे व्यक्तित्व (जाडी असूनही) मोहक असते व जर तिने तसा वेष परिधान केल्यावर फरक पडत नसेल तर नक्कीच परिधान करावा.
एखाद्या एक्जिक्युटीव्ह क्लास / अधिकारी वर्गातल्या मुलीने (डोळ्यासमोर पटकन केसरीच्या विणा पाटील आल्या !) सूट परिधान केल्यास नक्कीच शोभून दिसेल पण त्याखाली चामडी बूट घालण्या ऐवजी पॉवरचे रंगबेरंगी स्पोर्ट शूज घातल्यास कसे दिसेल ?
लग्नाला जाताना पैठणी घरात असेल तर ती न नेसून मीडी व पोटाच्या बेंबीपर्यंतच पोहचणारा टॉप घालून गेलेली स्त्री माझ्या माहितीत नाही !
स्त्रीचे व्यक्तित्त्व साडी व इतर कपड्यांमध्ये वेगळे भासते असे कदाचित शशी थरुर ह्यांचे म्हणणे असावे हा माझा कयास आहे.
सर्व साधारणपणे (आपण संकेतस्थळांवर चर्चा करतोय हे लक्षात ठेवता) सर्वच मंडळींना आपणास काय 'सूट' होते ते व्यवस्थित कळतेच की.....
मनोगती महिलांचे याबाबतीत काय म्हणणे आहे ?
कुशाग्र,
एखादा लेख / चर्चेचा विषय पटलावर ठेवताना स्वत:ची निश्चित मते काय आहेत ते लेखाच्या शेवटी किंवा कमीत कमी प्रतिसादांत देणे हे चांगल्या चर्चाकाराचे/लेखनकर्त्याचे लक्षण समजले जाते.
तसेच अधून मधून आपण जन्माला घातलेल्या अपत्याचे संगोपन कोणत्या दिशेने सरकते आहे हे बघून त्यावर टिप्पणी करणे तितकेच महत्त्वाचे !
प्रियालींनी सुरुवातीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे त्या लेखांचे दुवे मिळाले असते तर शशी थरुर ह्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते केवळ कुशाग्र ह्यांच्या वक्तव्यावर अवलंबून न राहता पडताळता आले असते असे मला वाटते !
हा एखाद्या संदर्भाचा विपर्यास झाला की विषयावर शशी थरुर ह्यांनी गदारोळ ओढवून घेतला ते कळलेच नाही......
*प्रथा= प्रघात/सर्व साधारण समज.