व्यावसायिकतेचा मुद्दा फार महत्वाचा आहे. अभ्यासाचाही विषय आहे म्हणून काही नोंदी....
साडीच पण बेंबीच्या खाली नेसलेली, लो कट चे ब्लाऊज आणि सतत पदराचे सावरणे की ढाळणे... अश्या स्त्रीबद्दल होणारे मत जीन्स व साधा टीशर्ट घातलेल्या स्त्रीबद्दल होणाऱ्या मतापेक्षा वाईट असते. तेव्हा नुसतं पाश्चात्य म्हणून ओरडत सुटण्यात काहीही अर्थ नाही.
वरचे कामाच्या वेळेला गैरसोय म्हणून साडी न वापरणे इत्यादी मुद्दे तर १००% मान्य आहेत. माझं काम एका जागी बसून करण्याचे नसते. मला संपूर्ण मुंबईभर फिरावे लागते अश्या वेळेला सकाळी निघताना एक कपडा चढवला की दिवसभर लक्ष द्यायला नको अश्या प्रकारचे कपडेच मला घालावे लागतात. त्या दृष्टीने जीन्स पेक्षाही सलवार कुडता बरा पडतो कारण तो ऐसपैस असतो आणि कुठल्याही हालचाली अडवत नाही. तसेच माझ्या हाताखाली काम करणारे ड्रेसमन हे अनेकदा पन्नाशीचे किंवा अजून मोठेही असतात त्या लोकांनी माझी डिग्निटी ठेवून काम करायचे असेल तर जीन्स पेक्षा सलवार सूट बरा कारण एक की जीन्स म्हणजे वयाने, अनुभवाने लहान मुलगी असे त्यांच्या डोक्यात असते.
वखवखलेल्या पुरूषी नजरांना सामोरे जाणे, गर्दीमधे नको त्या ठिकाणी केलेले स्पर्श सहन करणे हे आज प्रत्येक घराबाहेर पडून काम करणारी मुलगी सहन करते. अंगापेक्षा बोंगा मोठा अश्या प्रकारचा कसलेही फिटींग नसलेला कपडा घालून सुद्धा. अंगभर नव्वार नेसून डोक्यावरून पदर घेऊन जाणारी एखादी आज्जी पण हेच अनुभव सांगेल आणि सलवार कुडता घालून दोन खांद्यावरून ओढणी घेऊन कॉलेजला जाणारी मुलगीही. तेव्हा कमी कपड्याशी या गोष्टींचा संबंध जोडणे हा निव्वळ मूर्खपणा आणि मखलाशी आहे.
हे म्हणजे कसं झालं ना की, मुलींना बाहेर त्रास होतो तर तो त्रास कमी करायला न जाता मुलीचे पंखच छाटून टाकायचे.
नग्नतेमधेही सौंदर्य आहे. ते निसर्गचा सुंदर चमत्कार या पातळीला येऊन बघता येणे हे फार कमी लोकांना जमते. बाकीचे मग अशी ही ओरड करत बसतात. ड्रेसकोड हा यातलाच एक तालिबानी प्रकार!!
स्त्रीला एकतर देव्हाऱ्यात बसवायचे नाहितर पायताणाच्या जागी.. एकतर सतत जपत रहायचं नाहीतर कुल्टा म्हणून शिविगाळ करायची. अहो बरोबरीचा माणूस म्हणून बघता नाहीच का येणार?