अमेरिकेतील एका राज्याचा नागरिक, शिक्षण-नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अमेरिकेतल्या अगदी मूळ भूभागाशी संलग्न नसलेल्या अलास्का किंवा हवाई बेटे, अथवा मेक्सिकोला चिकटून असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषकांची वसती असलेल्या राज्यात विनापरवाना जाऊ शकतो व  त्याला तिथे आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येतो. महाराष्ट्राची तुलना म्हणूनच अमेरिकेतील राज्याशी करता येईल, जर्मनी-जपानशी नाही.

अमेरिकेला भूगोलाच्या पुस्तकात संयुक्त संस्थाने म्हणतात, म्हणून मी संस्थान लिहिले होते.  आपल्या देशातील प्रिन्स्‌ली  स्टेट्‌स्‌ना आपण संस्थाने म्हणत होतो.  आता हिंदीत संस्थान मराठीतल्या 'संस्था'करता वापरतात.

'राज्य' शब्द मला तितकासा आवडत नाही. (त्यापेक्षा संस्थान, प्रांत, परगणा किवा इलाखा हे सोपे शब्द आहेत).  दोन तालव्य शब्दांचे जोडाक्षर बोलताना टाळूवर उगीच ताण पडतो. च्च, ज्ज, च्छ, ज्य, झ्य वगैरे.  मेघदूतातल्या "याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा"तल्या 'च्ञा''चा उच्चार मला अजूनही बरोबर जमत नाही.  म्हणून मी राज्य शब्द टाळला असावा.

भाषेचा विकसित-अविकसितपणा विषयनिहाय वेगळा असू शकतो हे मिलिंद याचे विधान मला पटले.  मी मराठीला अविकसित म्हटल्याचे मला स्मरत नाही त्यामुळे मला चुटपुट किंवा रुखरुख लागण्याचे कारण नाही.

मिलिंद यांनी ज्योतिष्याला ज्ञानशाखा म्हटले आहे.  आपल्याकडे विद्या आणि ज्ञान या शब्दांचा वापर वेगळ्यावेगळ्या अर्थांनी करण्याचा प्रघात होता.  ज्ञान म्हणजे मुक्तीसाठी उपयोगी पडते ती विद्या किंवा शिक्षण. इंग्रजीलासुद्धा ज्ञानभाषा म्हणण्यापेक्षा विद्याभाषा संबोधणे जुन्या रूढीनुसार अधिक योग्य ठरेल.