इन्फोसिसच्या मैसूरच्या कार्यालयात राष्ट्रपतींना आमंत्रित केलं होतं. प्रथेप्रमाणे भारताचे राष्ट्रपती जेव्हा उपस्थित असतात तेव्हा राष्ट्रगीताचे 'लाईव्ह' गायन केले जाते. अशा सभेत ध्वनिमुद्रित राष्ट्रगीतही वाजवले जात नाही. नारायणमूर्तींनी राष्ट्रगीताचे गायन होऊ दिले नाही, त्याची ध्वनिमुद्रित प्रतही वाजवू दिली नाही तर केवळ "जन गण मन.."चं संगीत वाजवलं. आणि कारण काय तर म्हणे राष्ट्रगीत गायनाने कंपनीचे परदेशी नोकर "embarrass" झाले असते ! व्वा! इंफोसिसच्या मूठभर पगारी परदेशी नोकरांना embarrassment  नको म्हणून भारतात, भारताच्या राष्ट्रपतींच्या समोर रिवाजानुसार राष्ट्रगीत गायन करायचे नाही ! हे पाहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्यांचे स्वर्गस्थ आत्मे भरून पावले असतील,नाही ? नारायणमूर्तींना एक प्रश्न विचारावासा वाटतो - ज्या परदेशीयांची त्यांना इतकी काळजी आहे त्यांच्या देशात "स्टार स्पँग्लड बॅनर"(अमेरिका) किंवा "गॉड सेव द क्वीन" (इंग्लंड) किंवा इतर देशांतील तत्सम राष्ट्रगीतं म्हणताना आजूबाजूला असलेल्या काळ्या भारतीयांचा विचार करतात का हो?