आमचं नाटक व्यवस्थितपणे पार पडलं. परीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी ह्या विषयावर नाटक सादर केल्याबद्दल खूप कौतुक केले. आम्हाला तिसरे बक्षीस मिळाले.
नाटक झाल्यानंतर घडलेल्या उहापोहांचे निष्कर्ष (हे मुलांना आणि मुलींना दोघांना लागू आहेत): (ह्यात लग्नानंतरच्या सुद्धा काही सूचनांचा समावेश आहे)
१. मुलामुलींनी आपल्या वयाचा विचार करावा. करिअरच्या मागे पळतानाच आपले योग्य ते वय उलटणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
२. पैशाला महत्त्व हे असावेच. पण त्यावरच सगळा जोर देऊ नये. माणसांचा स्वभाव, राहणीमान वगैरे विचारात घ्यावे. सुरवातीला आर्थिक स्थिती आपल्या मनासारखी नसली तरी लग्नानंतर आपण आपल्याला हवे तसे बदल घडविता येतात.
३. रंगरूप महत्त्वाचे आहेच. पण त्यालासुद्धा मर्यादा हव्यात. जोडीदाराच्या दिसण्यामध्ये देखणेपण असावे तसेच आपण कसे आहोत हे बघून त्याप्रमाणे जोडीदाराबद्दल अपेक्षा असावी. प्रत्येकालाच काही शाहरुख/सलमान/ऐश्वर्या मिळत नाही.
४. लग्नानंतर अनेक नवीन माणसांशी संबंध येत असतो. त्यामुळे आपलीपण थोडी बदलण्याची तयारी असणे गरजेचे आहे. आपल्याच म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत नाहीत.
५. लग्नानंतर आपल्यावर जबाबदारी येते. आपल्या वागण्याबोलण्यावर इतरांचे लक्ष असते. लग्नाआधी आपल्यामध्ये अल्लडपणा असतो, जबाबदारीची इतकीशी जाणीव नसते. त्यामुळे जेव्हा आपल्याला लग्न करायचे आहे असे वाटते तेव्हापासून आपल्यातल्या उणीवा जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. कोणीही १००% बरोबर असूच शकत नाही. पण आपल्याकडून क्षुल्लक चुका घडून आपला जोडीदार, सासू, सासरे अथवा इतर नातेवाईक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. छोट्याश्या मानापमानाच्या गोष्टीतूनच रणांगण माजते. ह्यासाठी घरातच आईवडीलांशी सुसंवाद साधावा.
६. लग्नानंतर जोडीदारात काही बदल हवे आहेत असे वाटत असले तरी एकदम त्याला/तिला बदलण्याचा प्रयत्न करू नये. थोडा वेळ जाऊ द्यावा व नंतर हळूहळू बदल घडविण्यास सुचवावे.
७. घरातील वयाने व अनुभवाने मोठे असलेल्यांशी संवाद साधावा व त्यांच्याकडून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.
८. सर्वात महत्त्वाचे: तडजोड आवश्यक आहे.
वरील सर्व सूचना ह्या घडलेल्या चर्चांचे निष्कर्ष आहेत. ह्यामध्ये काही कमीजास्त वाटत असल्यास आपल्या प्रतिक्रियांतून जरूर कळवाव्यात.