नाट्यछटेत खरे सांगायचे तर नुसतीच भाषाच कृत्रिम व बटबटीत नव्हती, तर (मला असे प्रामाणिकपणे वाटते की), हा फॉर्मच कृत्रिम होता. म्हणजे एका छोट्याश्या स्वगतिकेत सर्व जे काही सांगायचे (आणि तेही काही हलके-फुलके नव्हे, तर समाजाच्या ढोंगी वर्तणुकीवर प्रकाश पाडणारे असे) तर त्यांतील नायक-पात्र तेव्हढ्याश्या अवधीत बरेच काही विसंवादी बोलणार. तरीही आपण दिवाकरांचे कौतुक करतो, कारण त्याकाळातल्या मराठी साहित्याच्या संदर्भात हे असे काहीही नवखे होते, पुर्वी कुणीही असे काही केलेले नव्हते. आता इथे सन्जोपांनी भाषा आतासाठी समकालीन (contemporary)  केली असली, तरी हे स्वगत ज्या तऱ्हेने सादर  केले जाते, ती तऱ्हाच मुळात ओढूनताणून आणलेली वाटते. व्यक्तिंच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या वागणूकीतला विरोधाभास प्रत्यक्षात इतक्या उघडपणे नजरेत येत नाही. तो खरे तर वेगवेगळ्या प्रसंगांतून नजरेत येतो, व तेही संवेदनाशील मनाने पाहिले तरच! ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तेंडुलकरांचे 'शांतता,...'

हा नाट्यप्रकार मराठी साहित्यातून बाद झालाच, पण इंग्रजी साहित्य, जे कितीतरी प्रगल्भ आहे, त्याततरी असे काही सध्या कुणी हाताळत आहेत असे मलातरी जाणवत नाही.

इथे मी संजोपांच्या प्रयत्नावर टिका करत नाही, माझा रोख ह्या नाट्यप्रकारावरच आहे.