श्रावणी,
मी वयाने (आणि म्हणून अनुभवाने) मोठा आहे यात शंका नाही. काका म्हणून संबोधले तर राग नाही पण नुसते प्रभाकर किंवा श्री. प्रभाकर मी जास्त पसंद करतो. असो.
पक्षी - प्राणी यांच्या बद्दल आपल्याला बालपणा पासून आकर्षण असते. या धरती वरचे ते आपले सहजीव आहेत. त्यांचेही कांहीतरी 'व्यक्तीमत्व' असते. त्यांच्या चेहर्यावरील आणि डोळ्यातील हावभाव पाहून, आपल्या बौद्धीक कुवतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या 'दृष्टीकोना'तून माणसाचे जग पाहावे, मजा येते.
कावळा हुशार पक्षी आहे. रोज - रोज खिडकीत येऊन बसणार्या कावळ्याला आपण तो 'तोच' आहे हे ओळखू शकत नाही. किंबहुना, 'त्याला' आपण तितके महत्त्वच देत नाही. पण, कावळा आपल्याला ओळखतो. माझ्या लहानपणी आमच्या स्वयंपाक घराच्या खिडकीवर रोज सकाळी (जणू घड्याळात वेळ पाहून) साडेनऊ वाजता एक कावळा यायचा. ती वेळ आमच्या आईची पोळ्या करण्याची होती. आई त्याला गरम-गरम पोळीचे तुकडे (तूप लाऊन) खायला टाकायची. तो आईला बरोबर ओळखायचा. कधी आईकडून घेऊन मी त्याला पोळी खाऊ घातली तर खायचा, पण खिडकीवरून वाकून आईकडे पाहून काव-काव करीत राहायचा. आईने एकतरी तुकडा देई पर्यंत काव-काव असा कलकलाट करीत बसून राहायचा. आईने एक तुकडा टाकला की घेवून जायचा. पुन्हा दुसर्या दिवशी साडेनवाला हजर.
जपान मधे कावळे ट्रॅफिक लाईटपाशी माणसांच्या बरोबरीने उभे राहतात. त्यांच्या चोचीत आक्रोड असतात. गाड्या थांबल्या की माणसांबरोबर उड्या मारत जातात, गाडीसमोर आक्रोड ठेऊन परत येतात. सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबतात. सिग्नल हिरवा झाला कि आक्रोडांवरून गाड्या जाऊन ते फुटतात. पुन्हा सिग्नल लाल झाला की पहिले फुटलेले आक्रोड खाऊन नविन आक्रोड तिथे ठेवतात. एखाद्या आक्रोडावरून गाडी गेली नसेल तर त्याची जागा बदलतात.
कावळे 'हत्यार' किंवा' 'आयुध' बनवितात. एखाद्या लवचीक काडीचा, तारेचा हुक बनवून आणि चोचीत धरून, सापटीत लपणारे किडे, अळ्या आणि इतर खाद्य 'त्या' आयुधाच्या साहाय्याने बाहेर काढून खातात. हे हत्यार किंवा आयुध एकदा वापरून फेकून न देता सांभाळून ठेवतात आणि पुन्हा - पुन्हा वापरतात.
वरील दोन्ही माहीतींचे स्रोत 'माहीती महाजाल' आहे.
धन्यवाद.