एक वेगळा लेख, आवडला.   अधिक विस्ताराने यावयास हवा होता असेही वाटले. असो

थोडासा विस्तार माझ्या नजरेतून:

गेल्या ६-७ वर्षांत मी फक्त एकदा-दोनदा बस प्रवास केला आहे. तो ही एखाद्या मोठ्या शहरात, कार नव्हती म्हणून. आमच्या गावात बस नाही, ट्रेन असून नसल्यासारखी आणि रस्त्यावर उतरून सहज वापरता/ उपयोग करता येतील अशी इतर कोणतीही सार्वजनिक परिवहनाची साधने नाहीत. लागून असलेल्या शहरातही अगदी मर्यादित बससेवा आहे. दोन वर्षांपूर्वी  अनेक प्रवासमार्ग बंद करून ही बससेवा अत्यल्प करण्यात आली कारण बसमध्ये प्रवासीच नसत, सपशेल तोटा. गावात वर्षातून दोन-तीनदा ट्रेन निघते. दरवर्षी सुट्टीच्या हंगामात राज्यप्रदर्शन भरते तेथे घेऊन जाते. ट्रेनमधून प्रवास करायला मुले बाळे, म्हातारेकोतारे आनंदाने येतात. आपल्याला ट्रेनने प्रवास करायला मिळतो याचे कोण अप्रूप. त्यांना ट्रेनप्रवास म्हणजे काय हेच माहित नसते.

'ढेंगभर अंतर तर जायचंय' असं म्हणण्यासारखे कोणते अंतरही आमच्या गावात नाही. साधा ब्रेड किंवा दूध विकत घ्यायचे झाले तर किमान अंतर १ मैलाचे. (जाऊन येऊन २ मैल). प्रत्येकाला गाडी ठेवावीच लागते, नव्हे प्रत्येक कुटुंबाला गाड्या ठेवाव्या लागतात. किमान २ ते ३.

अमेरिकन माणसाचा सर्वाधिक वेळ घर, कामाकाजाचे ठिकाण यानंतर अर्थातच त्याच्या वाहनात जातो. रोजचा ५० मैल प्रवास करावा लागत असेल तर त्या कारला अगदी हमखास एखाद्या लहानशा घराचे स्वरुप आलेले असते. कपडे, खाद्यपदार्थ, पेये, मेक-अपचे सामान, औषधे, संगीताच्या सीडीज, पुस्तकांच्या ऑडियो सीडीज, मुलांना मागे बसून बघायला सिनेमांच्या डिविडी, चपलांचे जोड, वर्तमानपत्रे, सायकली, स्केटस, फूटबॉल  अशा नानाविध गोष्टी गाडीत सापडतात.

सध्या हिमवर्षाव संपल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. (पॉटहोल्स). रस्त्यांची रुंदीही इतकी लहान असते की आतल्या माणसांना, सामानाला धक्का न लागता गाडी खड्ड्यात घालणे आणि बाहेर काढणे हा एक अतीव कौशल्याचा भाग असतो. रात्रीचे रस्त्यांवर दिवे (स्ट्रीटलाईटस) असणे म्हणजे कोण भाग्य. माझ्या परिसरात हायवे सोडून इतर कोणत्याही रस्त्यांवर लाईट नाहीत. खोदाखोद, नवीन बांधकाम, रस्तेबांधणी, जोडणी ही कामे वसंत ते शिशिर ऋतूदरम्यान होत असल्याने सर्वत्र केशरी पिंप, क्रेन्स आणि पुटीपटपट मशिन्स (हे डोनाल्ड डकने दिलेले नाव, अन्यथा सिमेंट मिश्रणाचे यंत्र) उभी दिसतात. सोबत कामगार आणि पोलिस आलेच. यासर्वांना पार करत नियम पाळत जाणाऱ्या अम्रूंच्या डोळ्यात कधीही वैताग दिसत नाही.

प्रत्येक रस्त्यावर लिहीलेल्या वेग-मर्यादेचे पालन करावे लागते. लिहीलेल्या वेग-मर्यादेच्या ५-१० मैल जास्त वेगाने गाडी हाकल्यास पोलिसमामा बघून न बघितल्यासारखे करतात, त्याहून अधिक वेगासाठी मात्र तुमच्या कानात सायरनचे सूर कधी किणकिणतील याची शाश्वती नाही. अम्रूंची शिस्त आणि अदब वाखाणण्याजोगी. 'पहले आप' म्हणणरे लखनवी नबाब त्यांना कधी शिकवणी देऊन गेले कोणास ठाऊक? हॉर्न वाजवणे म्हणजे कमीपणा, बाजूच्या चालकाकडे रागीट कटाक्ष टाकणे म्हणजे उद्धटपणा. एखादी गाडी रस्ता अडवून उभी असेल तर शांतपणे सगळे ती तिथून काढण्याची वाट पाहतात. अशावेळी माझी मुंबईची भाषा मनातल्या मनात तल्लख होते असा अनुभव आहे. हळूच "अबे हटा ना! काय को टाईम की खोटी कर रहेला है।" असे म्हणण्याची अनिवार इच्छा अनेकदा दाबून टाकली आहे.