हे आरसे बहिर्वक्र असतात ज्या योगे वाहनाच्या मागील बाजूचे जास्तीत जास्त दृश्य दिसावे. जर हे आरसे सपाट असतील तर वाहनाच्या मागचा थोडाच भाग दिसेल. पण बहिर्वक्र आरशांचा एक तोटा हा की त्यातून दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात जवळ असतात. परंतु अंतरापेक्षा दृश्य (मागील वाहने, व्यक्ती इत्यादी) जास्त महत्त्वाचे असल्याने ही तडजोड करावी लागते.
ह्यावर उपाय असा की खूप मोठ्या आकाराचे सपाट आरसे वापरायचे ज्यायोगे मागचे पुरेसे दृश्य दिसेल. पण अशा मोठ्या आरशांचा तोटा हा की त्यांचा वाहतुकीला अडथळा होऊ शकतो कारण ते वाहनाच्या बाहेर जवळजवळ फूटभर बाहेर डोकावतील. अमेरिकेत सर्वसाधारणपणे अवाढव्य आकाराच्या ट्रकांना असणारे आरसे असे मोठे आणि सपाट असतात कारण दहा फूट रुंदीच्या वाहनाला दोन्ही बाजूला फूटभर डोकावणारे आरसे काही फार अडचण करीत नाहीत, पण छोट्या वाहनांचे आरसे छोटे (साधारण पाच सहा इंच बाहेर डोकावणारे) आणि बहिर्वक्र असतात.
टीप: वाहनाच्या आत असणारे आरसे (कार वगैरे) नेहमीच सपाट आणि पुरेसे मोठे असतात. वरील चर्चा फक्त वाहनांच्या उजव्या/डाव्या बाजूला असणाऱ्या आरशांबद्दल आहे.