मराठी भाषेतील वाचन कमी झाले आहे असं मला वाटत नाही. तसे असते तर मराठी भाषेतील इतकी संकेतस्थळे निर्माण झालीच नसती. मात्र मनोरंजनात्मक मराठी लेखन आणि वाचनाची व्याप्ती इतर प्रबोधनात्मक वाड़̱ग्मयीन प्रकारांच्या तुलनेत अधिक आहे असे म्हणता येईल. तरीही विविध मराठी संकेतस्थळांवर प्रबोधनात्मक लेखन, चर्चा येत असतातच. याला मनोगतही अपवाद नाही हे नक्कीच. विविध साहित्य कृतींची ओळख, त्यांचे रसग्रहण, भावस्पर्शी मराठी (आणि  इतर भाषिकही) चित्रपटांचे रसग्रहण , मराठी गीतांची ओळख, इत्यादी लेखन मनोगतवर तसेच अन्य मराठी  संकेतस्थळांवर तसेच विविध अनुदिनींवर (ब्लॉग) आलेले मी वाचले आहे. मनोगतचेच उदाहरण घ्यायचे झाले तर संजोप राव, चित्त, सर्किट, अत्यानंद, आणू, प्रदीप, कोलबेर, केशवसुमार, माधव कुलकर्णी अडी प्रभृतींचे दर्जेदार लेखन याची साक्ष देतील. (आणखीही मान्यवर खूप दर्जेदार आणि संपन्न लेखन पार्ट्याही करीत असतात याची मला जाणीव आहे. सगळीच नांवे आता आठवत नाहीत. त्या सर्वांनी माझ्या विस्मरणाला क्षमा करावी ही विनंती). मी स्वतः सध्या 'आखाती मुशाफिरी' या माझ्या लेखमालेतून सुमारे तेवीस वर्षांपूर्वीच्या आखातातील बहिःस्थ कामगार जीवनाची ओळख करून देत आहे. तेव्हा मराठी लेखन-वाचनात फार मोठी त्रुटी आहे असे मला वाटत नाही.