एप्रिलच्या महिन्यात पत्त्यांचा विषय काढलात आणि या दिवसांत केलेल्या पत्त्यांच्या 'कुटिल' कारस्थानांची आठवण झाली. ऑफिसमधे बसून असल्या गोष्टी आठवणं म्हणजे भारीच धोकादायक काम!
तीनशे चार ची मॅरेजेस 'तयार करणं', चॅलेंजमधे खोटे पत्ते लावणं, नॉटेठोम(! )मधे 'भीक मागणं वगैरे रोमहर्षक गोष्टी क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून गेल्या. लॅडिज बद्दल खूप ऐकलंय पण अजून खेळायचा योग नाही आला. त्यातलं ते वख्खई, लाडू. पिशी वगरे ऐकताना खूप मजा येत असे. सात कॅटस एकत्र करून खेळलेला गाढव डाव झब्बू पास च्या पानांचं महत्त्व शिकवून गेला होता.
पत्त्यातल्या खेळांचा राजा म्हणजे अष्टोत्री. त्याचे किती डाव रंगायचे आणि किलवर गोटू चं तोंड कसं काळं करावंसं वाटायचं हे आठवून हसू आले. हाच खेळ उनो या नावाने वेगळे पत्ते घेऊनही खेळतात आणि त्यात शेवटी एक पान हातात उरलं की उनो असं ओरडायचं असतं नाहीतर दोन पानांचा भुर्दंड मिळतो. पण त्या पत्त्यांमधे कधी आपल्या या चार राजघराण्यांची मजा नाही आली.
ब्रिज शिकायची इच्छा आहे. पुढेमागे पूर्ण होईलही. सध्या मात्र कोणालाच कोणाचा पत्ता नसतो त्यामुळे अनेक वर्षात सगळी भावंडं एकत्र जमून पत्ते खेळणं झालेलं नाही. काळाच्या एकाच जबरदस्त फटकाऱ्याने ते बालपणीचे पत्त्य्यंच्या जगातले सोनेरी दिवास कुठेतरी हरवून गेले आहेत. आता आठवणी काढायच्या आणि त्या आठवणीतली मुलं आपणच होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त करत रहायचं एवढंच हातात उरलं आहे. पत्त्यातले डाव संपून आयुष्याच्या डावाची पानं हातात आली आहेत.
यावरून एक वाक्य आठवलं की जगात आता राण्या अशा पाचच उरल्या आहेत. चार पत्त्यातल्या आणि एक लंडनची!

 लेख फार सुरेख झाला आहे. आवडला हेवेसांनल
--अदिती