आपण मुंबईसंबंधी जे काही लिहिले आहे, विशेषतः पारश्यांच्या संबंधात, ते अगदी बरोबर असले, तरी १९६० साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा वरील निकष लावल्यावर हे लक्षात येईल की तेव्हा मुंबईत अधिकांश लोक मराठी मातृभाषा म्हणवणारे होते.
येथे अधिकांश म्हणजे त्यातल्यात्यात मोठा समूह. अन्यथा मुंबईत मराठी माणूस बहुसंख्य (५०% हून अधिक) गेल्या शंभर वर्षात कधीच नव्हता.
त्याचप्रमाणे, बेळगाव, निपाणी व कारवारलाही ते खरे म्हणजे लागू पडतात. आजही त्या जागांत अधिकांश जनता मराठी आपली मातृभाषा मानते.
येथे अधिकांश म्हणजे ५०% हून अधिक.
मराठीचा अभिमान असावा, दुराभिमान नसावा, वगैरे सर्व खरे आहे. पण भाषावार प्रांतरचनेमागील कारणे समजावून घेतली, तर गल्लत होणार नाही. आणि भाषावार प्रांतरचना हे काही फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नाही, ते सर्वच राज्यांच्या बाबतीत लागू होते.
हे मात्र अगदी मान्य. मुळात भाषावार प्रांतरचना ही पोट्टी श्रीरामुलु (वयाच्या ५१व्या वर्षी उपोषण करून प्राणत्याग केलेले गांधीवादी) यांच्या मरणाने साध्य झालेली गोष्ट. ते तेलुगू होते आणि मराठी नव्हते म्हणून आज "मराठीचा दुराभिमान नसावा" असे सल्ले मिळतात. असा सल्ला तेलुगू लोकांना देण्याचे धाडस कोणी करेल असे वाटत नाही. बाभळी बंधाऱ्याबाबत जे सध्या चालले आहे त्यामुळे तर अजिबातच नाही!
आता मूळ लेखाकडे:
भाषा हा निकष लावायचा तर "अटकेपासून कटकपर्यंतचे" राज्य मराठ्यांचे नव्हते काय?
राज्य होते याचा अर्थ तेथील महसूल मिळत होता. पैसा मिळत असताना आपली भाषाही त्या लोकांनी वापरावी असा अट्टाहास धरण्यात अर्थ नव्हता हे सुदैवाने मराठा सेनापतीने जाणले.
सीमेवरील आक्रमणे मोडून काढणाऱ्या शीखांनी कोणत्या "भाषेचे" रक्षण केले?
हा अत्यंत गैर मुद्दा आहे. मुळात शीखांनी सीमेवरील आक्रमणे मोडून काढली हा गैरसमज आहे. अन्यथा कोणीही खैबर खिंड ओलांडून इकडे येऊच शकला नसता. आणि तरीही त्यांनी कोणत्या भाषेचे रक्षण केले? तर कोणत्याच नाही. त्यांनी आपली गुरुमुखी लिपी जपली आणि आजही ती प्रचलित आहे.
राष्ट्रभाषा हिंदी म्हटल्यावर इतर भाषांचे महत्त्व कमी होते का? आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळात हा ख़रं म्हणजे हा प्रश्नच उरत नाही.
मुळात हिंदी हे भाषा कोठून आली? दोनशे वर्षांपूर्वी हिंदी होती काय? नाही. व्रज, अवधी, भोजपुरी अशा बोलीभाषा होत्या आणि आहेत. हिंदी ही एक 'सामायिक' भाषा असण्याच्या गरजेतून निर्माण झालेली नलिका संतती (test tube baby) आहे. पूर्वी उर्दू होती आणि 'हिंदुस्थानी' होती. त्यांचा विषमसंकर म्हणजे हिंदी. ती आपली 'राष्ट्रभाषा' आहे हे आपले प्राक्तन. 'आजच्या जागतिकीकरणाच्या काळात' खरे तर इंग्रजी सोडून इतर कुठलीही भाषा काही मायना ठेवीतच नाही.
थोडक्यात, स्वसंशयाचे असले भोवरे टाळावे आणि मराठी असल्याचा न्यूनगंड बाळगू नये. मराठी असल्याचा अभिमान बाळगण्यासारखे फार काही नसल्यासारखे वाटले तरी त्याची लाज बाळगावी असे खचितच काही नाही. शेवटी वसंत बापटांच्या कवितेतल्या ज्या ओळी (केवळ माझा सह्यकडा) जोडल्या आहेत त्याच खरेतर संकुचित मनोवृत्ती दाखवतात (भव्य ते तुमच्याआमच्या सगळ्यांचे, आणि माझे ते माझे). शेवटी "मराठी माणूस" याच मानसिकतेपोटी मागे पडला.