माझी मुंज झाली आहे. त्याने माझ्या आयुष्यात विशेष फरक पडला असे वाटत नाही, तरीही त्या समारंभात मी जी मजा केली, तशी मजा इतरांनी का करू नये असे मला वाटते.
मला तर स्वतःची मुंज होत असतानाच त्यातील फोलपणा जाणवत होता. हा छळ माझ्या मुलाचा होऊ नये म्हणून त्याची मुंज केली नाही. 'एक संस्कार असतो' वगैरे खुळचटपणा मोडून काढायला एक माफक धैर्य लागते. ते एकदा गोळा केले की 'सर्किट आदमी है' असे म्हणून जनता मागे लागत नाही. अशामुळे तुमच्या लोकप्रियतेचे रेटिंग वाढत नाही हे खरे, पण शेवटी सगळ्याच गोष्टी लोकप्रिय होण्यासाठी थोड्याच करायचा असतात?
तेंव्हा हे ज्याने त्याने आपापले बघावे. समाज वगैरे बदलायला जाऊ नये. माझ्या भाच्याच्या मुंजीत आठएकशे पान उठले. लाखभर रुपये खर्च झाले. असेच एप्रिलचे दिवस होते. प्रचंड उकाडा होता. पण बहीण आणि मेहुण्यांच्या चेहऱ्यावरुन घामाच्या धारांबरोबर कैवल्यस्वरुपी समाधान निथळत होते. आता इथे काय करणार?
असाच कणखरपणा दाखवून 'वैकुंठ' मध्ये 'कोणतेही विधी नाहीत' असे पाचपन्नास लोकांच्या नजरेत नजर घुसवून किंचित वरच्या आवाजात सांगण्याचा प्रसंग आला. मग नंतर लोक त्याला 'पण काही म्हणा, विचार मॉडर्न आहेत हां तुमचे! आपणही काळाप्रमाणं ....ह्या: ह्या: ह्या:... बदलायला शिकलं पाहिजे! काय, आलं की नाही ध्यानात?' असे आपल्यालाच सांगतात! आपण आपले 'बाजीचा-ए-अत्फाल है दुनिया मिरे आगे, होता है शबो रोज तमाशा मिरे आगे' असे आठवून स्वस्थ रहावे!