ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे जर खरंच मराठी प्रकाशनव्यवसायाला चांगले दिवस आलेले असतील, तर ती एक आनंदाची बाब आहे. दोनच वर्षांपूर्वी दादरमधल्या एका मोठ्या दुकानदाराशी बोलताना असे वाटले होते की हा धंदा आता फार दिवस चालू शकणार नाही. ते त्यांचे मुंबईतले, तसेच बृहन महाराष्ट्र परिषदेतले अनुभव मला सांगत होते, ते फारच निराशाजनक होते.

आता जर असे सुगीचे दिवस आले आहेत, तर एक वाचक म्हणून मी प्रकाशकांकडून किमानपक्षी थोडीशी तरी सौजन्याची व पुस्तकाच्या बाईंडिंगबद्दल काळजीपूर्वक असण्याची माफक अपेक्षा करेन. सुमारे चार वर्षापूर्वी, नेहमीसारख्या धावत्या मुंबईभेटीत मी अनिल अवचटांचे 'छंदांविषयी' कसे घेतले त्याची आठवण येते. पुस्तक ज्या मॅजेस्टिक प्रकाशनाचे आहे, त्यांच्याच शिवाजी मंदिरातल्या 'प्रदर्शनात' त्याची केवळ एकच प्रत होती. प्रतीत पाने पार उलटीसुलटी लागली होती. कुठल्याही नामांकित (मराठी सोडून) अन्य प्रकाशनाने अशी प्रत बाजारात आणली नसती. पण हे अर्थातच, खास मराठी प्रकाशक. मी तेथील मॅनेजरना हे दर्शवले. त्यावर त्यांनी काहीही दिलगीरी व्यक्त न करता मला एव्हढेच सांगितले की ही एकच प्रत आता तेथे उरली आहे (पाहिजे तर घेवून जा...). मला वेळ नव्हता, व गरज होती, म्हणून मी ती घेतली. अशी प्रत विकण्याबद्दल त्यांना काही किंमत स्वतःहून कमी कराविशी वाटली नाही (व अवचटांच्या प्रेमापोटी मी तशी काही मागणी केली नाही).

अलिकडे दादरमधल्या दूसऱ्या नामांकित दुकानातून घेतलेल्या डॉ. बावस्करांच्या ("बॅरिस्टरचं कार्ट"), पुस्तकात, पहिल्या व दुसऱ्या मलपृष्ठावर पेन्सिलीने केलेल्या खुणा होत्या (' परत'... वगैरे).

तेव्हा आता ह्या नव्या तेजीमुळे मराठी प्रकाशक व पुस्तकदुकानदार नव्या उत्साहाने कामाला लागतील अशी माफक आशा धरूया.