शाळेत नाव घालणे म्हणजेच आजकालची मुंज
हे परिस्थितीचे किरकोळीकरण (trivialization) होते असे वाटत नाही का?
बेताची परिस्थिती असणाऱ्या महागड्या शाळेत मुलांना न पाठवू शकणाऱ्या शेजाऱ्यांसमोर लॉयला किंवा सेंट मिरात शाळाप्रवेशाकरता ईंटर्व्यू देण्याचा गवगवा करणे आणि वाजत गाजत मुंज करणे दोन्हीही तितकेच सामाजिक/आर्थिक दुही माजवणारे आहे परंतु चर्चा मांडणाऱ्यांच्या नजरेतून एकतर हा मुद्दा सुटला आहे किंवा (तथाकथित-) उच्चवर्णीय-विरोधी/पुरोगामी धूळ उडविण्याच्या नादात तो त्यांनी सोयिस्कर रित्या बाजूला ठेवला आहे.
येथे मात्र थोडा घोळ वाटतो. पहिले म्हणजे 'इंटरव्ह्यू देण्याचा गवगवा करणे' ही गोष्ट कळली नाही. तो गवगवा मुहूर्त काढून, पत्रिका छापून, जेवणावळी घालून केला जातो की काय? मला स्वतःला असा गवगवा कुठे बघायला मिळाला नाहीये. दुसरे म्हणजे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केव्हाही वाईटच असे माझे मत असल्याचे ठासून सांगतो. मग ते वाढदिवसाच्या नावाने केलेले असो वा निवडणूक जिंकल्याच्या निमित्ताने वा कुणाच्या 'स्मृतिदिनाच्या' निमित्ताने. तिसरे म्हणजे या दोन्ही उदाहरणांमधला मूलभूत फरक हा आहे की पैसा जर नसेल तर भीक मागून, कर्ज काढून, चोरी करून मिळवता येतो (तो तसा मिळवावा असे माझे मत अजिबात नाही). पण 'जात' यापैकी कुठल्याही उपायाने मिळवता येते असे माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळे जातींच्या आधारावर भेदभाव करणारे विधी आणि नुसतेच पैशांचे प्रदर्शन या दोघांत फरक आहे असे मला वाटते. आणि तो या सगळ्या चर्चेचा शीर्षकहेतू आहे.
मी (तथाकथित अथवा इतर कुठल्याही प्रकारचा) उच्चवर्णीय-विरोधी / पुरोगामी नाही. मी फक्त एका विषयावर चर्चा करू इच्छितो. जर तो विषय कुणालाही मानवीय चर्चेबाहेरचा वाटत असेल तर त्यांनी तसे सरळ सांगावे. "(बायबल / कुराण / असेच काही) हा अखेरचा शब्द, त्यावर चर्चा होऊ शकतच नाही" असे ठामपणाने सांगणारे लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा होऊ शकत नाही. तसे कुणाला दार बंद करायचे असेल तर त्यांचे ते स्वातंत्र्य अबाधितच आहे. मात्र 'तथाकथित', 'धूळ उडविणे', 'सोयिस्कर रित्या' हे शब्द मला काहीसे वैयक्तिक पातळीवर उतरल्याचे निदर्शक वाटतात. तसे नसेल आणि हा माझा गैरसमज असेल तर आगाऊच (आधीच) दिलगिरी व्यक्त करून ठेवतो.