प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद! ( काही मनोगतींना यातले काही मुद्दे हास्यास्पद वाटले तरीही!)


श्री. प्रदीप/श्री सुनील / श्री छू  यांचा प्रतिसाद-

भाषावार प्रांतरचना ही फसलेली गोष्ट नाही. भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला व त्यांच्या व्यवहारातील वापराला चालना मिळाली. मराठी माणसांचा आयडेंटिटी क्रायसिस बराच जुना आहे. मात्र तेलुगू, तमिळ व कन्नड भाषिकांचा असा गोंधळ होत नाही. मराठीची जितकी बोंब आहे तितकी इतर भाषांची होत नाही.

आपण कोणत्या विकासाची गोष्ट करीत आहोत? विकासाचा संबंध राजकीय इच्छाशक्तीशी आहे, भाषेशी नाही.आणि तसा विकास झालाच असेल तर महाराष्ट्र आणि बिहार असा विकासाचा असमतोल का? फरक का? फार लांब कशाला, मराठी विदर्भ आणि मराठी कोंकणाचा असमतोल आपल्याला दिसत नाही का?

शासकीय मराठी वाचली तर आपल्या लक्षांत येईल ,  यात  सोय आहे की गैरसोय? आणि आयडेंटिटी क्रायसिस चा प्रश्न हा फक्त मराठी माणसांपुरता मर्यादित नाही, तो सर्व भाषिकांना लागू होतो.बंगळूर मधल्या कानडी माणसाला विचारा... तो तमिळीच किती द्वेष करतो ते! तीच गोष्ट आसामी आणि बंगाली..... मराठी आणि गुजराती, बंगाली आणि बिहारींची...! भाषावार प्रांतरचनेची ही विखारी फळे आहेत. राजकारण्यांनी त्यातला विखार सतत तेवत ठेवला....

मराठी माणसाला सगळ्यात जास्त भीती किंवा लाज वाटत असेल तर आपण मराठीचा आग्रह धरला तर आपल्याला इतर लोक संकुचित म्हणतील याची. हिंदी/तमिळ/कन्नड/तेलुगू/बंगाली वगैरे भाषक त्यांच्याच भाषेत बोलतात व इतरांनीही त्याच भाषेमध्ये बोलावे असा आग्रह धरतात. मात्र मराठी माणूस असा आग्रह इतर भाषकांसोबत तर सोडाच तर मराठी भाषकांसोबतही कधी धरत नाही.

महाराष्ट्राबाहेर मराठी माणूस अधिक मराठी असतो असा अनुभव आहे. मराठी सण- वार अधिक उत्साहाने साजरे करतो. भेटल्यावर आवर्जून मराठी बोलतो ( अर्थात काही अपवाद आहेतच!) तीच गोष्ट अन्य भाषिकांची! त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेतून ते आपली अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला तो त्यांचा अभिनिवेष वाटतो!

कर्नाटक व महाराष्ट्राची संस्कृती ही फारच एकजिनसी आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कन्नड भाषा येत असलेली हजारो कुटुंबे सापडतील तीच गोष्ट उत्तर कर्नाटकाची आहे तेथे मराठी येत असलेली हजारो कुटुंबे आहेत. अन्न-वस्त्र-निवारा यात कमालीचे साधर्म्य आहे. कर्नाटकातील बहुसंख्य लोकांचा मराठी लोकांप्रमाणेच प्रमुख देव विठ्ठल आहे. तीच गोष्ट पुरणपोळीची!

कर्नाटक व महाराष्ट्रच का, संपूर्ण भारताचीच संस्कृती ही फारच एकजिनसी आहे ! राम आणि कृष्ण ही इथली दैवते आहेत आणि रामायण आणि महाभारत ही इथली महाकाव्ये! इथले संगीत , नाटक , लोककला या मध्यवर्ती संकल्पनेभोवती विकसीत झाल्या. एका राम नामाची ही विविध रूपे पाहा.... राम सिंग , रामजी, रामुभैय्या, रामचंद्रराव, रामाण्णा, रामन, ......!  जयदेवाच्या गीतगोविंदाची तामीळित पारायणे  होतात, नामदेवांचे अभंग शीख आवडीने गातात, एक मराठी राजा काशीविश्वेश्वराला मुक्त करण्याची शपथ घेतो, एखाद्या महात्म्याला चंपारण्यात सत्याग्रह करावा वाट्तो...शिखांनी छातीचा कोट केला नसता तर खचितच तामीळनाडूतील देवालये सुरक्षित राहिली असती अशी किती उदाहरणे सांगता येतील?

भाषा, वेषभूषा, खाद्यसंस्कृती, सण-वार यातले वैविध्य ही बहुतांशी भौगोलिक अपरिहार्य ता आहे.त्यात अभिनिवेष बाळगण्यासारखे काहीही नाही! त्या सगळ्यानं गुंफणार "भारतीयत्व"नावाचा समान धागा आहे. त्याचे भान सातत्याने आपल्याला हवे. जातीय , प्रांतीय, भाषिक, या भेदांच्या पलीकडे आपण जेव्हा आपली दृष्टी विशाल करू तेव्हा आपण एका विशाल कुटुंबाचे घटक आहोत हे आपल्या लक्षात येईल, अन्यथा कॉ. विकींच्या म्हणण्यानुसार .. दलित मराठी आणि सामान्य मराठी माणूस असाही भेद करता येतोच की! अगोदर मी माझा, मग माझ्या घरच्यांचा .̱गल्लीतला... गावातला... राज्याचा आणि सगळ्यात शेवटी भारतीय! हा क्रम जेव्हा आपण उलटा करू तो सुदिन!

वास्तविक मूळ लेखाचा विषय हाच आहे. तो अधिक विस्ताराने मांडायला हवा होता.. हे मी मान्य करतो, त्यांमुळे काहीना वैचारिक गोंधळ वाटला असण्याची शक्यता आहे.क्षमस्व! 

हे पूर्णपणे बरोबर नाही. मराठीवर संस्कृतपेक्षाही तेलुगू व तमिळ भाषेचाही जबरदस्त प्रभाव आहे. तमिळ भाषा ही संस्कृताइतकीच जुनी व संपूर्णपणे वेगळी असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.

तामीळ बद्दल मी बोललो होतोच,संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

काही मुद्द्यांची पुनुरुक्त्ती झाली आहे, ते पुन्हा टंकीत नाही.

इंग्रजांनी राज्यकारभारासाठी केलेल्या "सोयी" आपण तश्याच्या तश्या उचलायला नको होत्या. "इंग्रजांच्या पूर्वी भारत हा एकसंध देश कधीच नव्हता हा एक सार्वत्रिक गैरसमज इंग्रजांनी करून दिला होता" वास्तविक विष्णुपुराणात स्पष्ट उल्लेख आहे:

 उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम / वर्षं तद भारतं नाम भारती यत्र संतति:

स्वातंत्र्योत्तर काळात नादान राज्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी आपल्याच इतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, हे आपले दुर्दैव! भाषावार प्रांतरचना हा असाच एक चुकीचा निर्णय! गतविस्मृत भारतीयांना त्याच्यातील सोय दिसली पण विभाजनाची विषारी मुळी दिसली नाही. भरीस भर आमचे विवेकशून्य राजकारणी!

आता थांबतो. सुज्ञ मनोगतींना अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि चू.भू द्या̱. घ्या.

-विटेकर.