साधारण अश्याच प्रकारची चर्चा इथे झालेली आहे. या चर्चेतील खालील प्रतिसाद १००% पटला

<<<मुलाचा स्वतःचा फ्लॅट असेल तर लगेच वेगळे राह्ण्याची अपेक्षा. सासू सासऱ्यांची जबाबदारी नको.

यात नेमके काय गैर आहे? उद्या मुलीने म्हटले, की तिच्या आईवडिलांची जबाबदारी तुम्ही घ्यावी, तर आहे तुमची तयारी?

आणि मुळात आईवडिलांची जबाबदारी मुलांची ही संकल्पना नेमकी कोठून आली? आईवडिलांनी आपल्याला वाढवले, मोठे केले ते मातृपितृऋण आपण आपल्या अपत्यांना वाढवून, त्यांचे संगोपन करून, त्यांना मोठे करून फेडायचे असते. मुलांची जबाबदारी ही आईवडिलांची असते, उलट नव्हे. आपल्या वृद्धत्वाची जबाबदारी ज्यानेत्याने स्वतः घ्यायची असते - ते झेपेनासे झाले की वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेतच. (किंबहुना आपण वानप्रस्थाश्रमाचा पूर्णपणे त्याग केला आणि वृद्धाश्रमही धड स्वीकारला नाही, हीच आपल्या संस्कृतीची शोकांतिका आहे, असे सद्य लेखकाचे मत आहे. परंतु हे पूर्णपणे अवांतर.) अर्थात एखाद्याने स्वेच्छेने आपल्या आईवडिलांची म्हातारपणी काळजी घेतली, तर त्याला विरोध नाही, पण ही त्याच्यावर सक्ती नाही किंवा ही त्याची जबाबदारी होऊ शकत नाही.

मग अशा परिस्थितीत मुलीने सासूसासऱ्यांची जबाबदारी घ्यावी ही अपेक्षा अथवा सक्ती कशी करता येईल? हे कितीसे रास्त आहे?>>>

(ती) फुलराणी