इतरांनी कसे वागावे हे ठरवण्यात आणि ते तसे वागले नाहीत म्हणून दु:खं करण्यात काहीच मतलब नाही. आपल्याला कसं वागलं तर छान वाटेल ते ठरवावे आणि मार्गक्रमण करावे.. आपण सुरूवात केली की आपोआप सगळे आपल्याला हवे तसे ( १००% नाहितरी ७०-७५% तरी नक्कीच ) होत जाते.

मला तरी असं वाटतं की रोज उठून एकाच माणसाचा ( नवऱ्याचा ) काय चेहरा बघायचा? एकाच व्यक्तीच्या एकसूरी गप्पा काय ऐकायच्या? त्यापेक्षा आपल्या जवळच्या लोकांचा आपल्याभोवती गराडा असला तर काय धमाल ! सर्वांनी मिळून गड्डाझब्बू खेळायचा .. किंवा आपापल्या सुट्ट्या जुळवून एकत्र फिरायला जायचं.. कोणी आजारी असलं तर आळीपाळीने सर्वांनी त्या/तिची काळजी घ्यायची.. आणि भांडणं.. तीतर असायलाच हवीत जेवणात मीठ असतं तशी.. पण मग मनवणं हवं.. शिक्षा हवी.. या सगळ्यात एक वेगळीच मजा आहे. संध्याकाळी कधी लाईट गेले तर सर्वांनी अंताक्षरी खेळावे.. काही दिवसांपासून सुरू असलेल्या कुरबुरी संपल्याने मूडमध्ये आलेल्या बाबांना त्यांनी लग्नात घेतलेला उखाणा घ्यायला सांगावा आणि त्यांनीही जास्त आढेवेढे न घेता तो घ्यावा ! भरपूर माणसं - म्हणजे भरपूर मजा, भरपूर चॅलेंजेस, भरपूर शिकणंशिकवणं आणि एक एकत्र कुटुंब !

माझ्यामते एकत्र कुटुंबात सर्वजणं असावेत - किमानपक्षी नवराबायकोचे आईवडील आणि ते दोघं तरी नक्कीच...

आईवडील हे जबाबदारी नसतात तर आपल्याला अनायासे मिळालेली एक प्रेमळ ठेव असते जी आपण जीवात जीव असेतोवर मनापासून जपली पाहिजे.

- वेदश्री.