लेख चांगला आहे. चर्चा उत्तम. आधुनिक जगण्यातल्या विषयांचा त्यात समावेश आहे. पण आदिवासींसाठी खरा संघर्ष कोणता? रोजची मीठ-भाकरी (हा केवळ सोयीचा शब्दप्रयोग आहे पदार्थ कोणताही असो) हक्कानं मिळवण्याचा की ती अनुषंगीक मार्गानं मिळवण्याचा?
एक प्रश्न आहे. त्या भागात आदिवासींना जंगल जमिनीवरचे अतिक्रमक मानण्याच्या समस्येची व्याप्ती किती आहे? तिथल्या प्रश्नांची मुळं त्याही समस्येत गुंतल्याचं काही विश्लेषण डॉ. प्रकाश आमटे यांनी केलं आहे का? देशातील आदिवासींच्या समस्येचं एक गंभीर कारण ते आहे, या विश्लेषणाशी ते कितपत सहमत आहेत?
जगण्याचं शाश्वत साधन नाही, ते नसल्यानं कुपोषण आणि शिक्षणाचा अभाव, म्हणून रोजगार नाही, तो नसल्यानं पिळवणूक, म्हणून समस्या, ती आहे म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारी जाणीवजागृती नाही, समस्येतून बाहेर पडत नसल्यानं जिणं तसंच राहतंय असं हे दुष्टचक्र आहे का?
आदिवासी कपडे घालत नव्हते वगैरे तपशील ठीक. त्यातून त्यांना बाहेर आणण्याची कामगिरी मोठीच. पण...
कुठंतरी एक पोकळी राहतिये. या सगळ्या भल्या माणसांनी वर्षांनुवर्षे काम करूनही. काय आहे ती?
या पोकळीचा संबंध त्यांच्या हाती असलेली जगण्याची साधने हिरावून घेण्याशी तर नाही. आदिवासी अगदी कुठंही सीमेवरच का असतात? (एका वेगळ्या परीभाषेत त्याला परिघावर राहणं असं म्हणतात.) साधनं हिरावून घेतली गेल्यानं ते परिघावर ढकलले गेले आहेत की, ते इतर काही कारणानं परिघावर ढकलले गेल्यानं त्यांची जगण्याची साधनं हिरावून घेतली गेली?
मला ठाऊक आहे, उत्तरं सोपी नाहीत. एकमेकांत गुंतलेले अनेक प्रश्न इथं आहेत. व्यामिश्र विषय आहे हा. पण चर्चा झाली पाहिजे, म्हणून हा थोडा विसंवादी सूर लावतोय.
जरूर लिहा.