इराकवर कारपेट बाँबिंग करण्याचा निर्णय बुश प्रशासनाचा होता. त्यात सामान्य अमेरिकनांचा कितपत सहभाग आहे? यात त्यांचा काय दोष आहे? सामान्य अमेरिकन माणसाचा माणुसकीवर तितकाच विश्वास नाही का जितका सामान्य भारतीय माणसाचा आहे? अमेरिकेची मूल्ये म्हणजे नेमके काय?

भारताने पोखरण चाचणी घेतली तेव्हा ती शांततामय वातावरणासाठी, भारताने बांगलादेश मुक्तीसाठी हल्ले केले ते स्वतःच्या संरक्षणासाठी व अमेरिकेने आता इराकवर हल्ला केला, इराण-सीरियावर हल्ला करण्याची धमकी दिली ती साम्राज्यवादी व हुकूमशाही प्रवृत्तीतून हा फरक योग्य आहे का?

भारतीयांनी दगडात, मातीत, झाडात, पाण्यात परमेश्वर पाहिला मात्र आपल्याचसारख्या हाडामांसाच्या माणसांत भारतीयांना वर्षानुवर्षे दिसला नाही - अद्यापही दिसत नाही हे शाश्वत, विशाल व सर्वसमावेशक मूल्य आहे का?