महाराष्ट्राबाहेर मराठी माणूस अधिक मराठी असतो असा अनुभव आहे. मराठी सण- वार अधिक उत्साहाने साजरे करतो. भेटल्यावर आवर्जून मराठी बोलतो ( अर्थात काही अपवाद आहेतच!) तीच गोष्ट अन्य भाषिकांची! त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेतून ते आपली अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला तो त्यांचा अभिनिवेष वाटतो!

माझा स्वतःचा तसेच माझ्या काही मित्रांचा अनुभव अगदी ह्याच्या विरूद्ध आहे. मी गेले कित्येक वर्षे परदेशात राहतो. माझा अनुभव असा की दोन मराठी माणसे भेटली, की शक्य तेव्हढे मराठीतून बोलणे टाळतात. अगदी न राहवून एकदोनदा मी इतरांचा रोष पत्करून सरळ विचारणाही केली. अशी ती करावी लागली, ह्यातच बरेच काही आले. ह्याविषयी बरेच लिहिता येईल, विस्तारभयास्तव ते मी टाळतो. पण छूंचे विधान 'हिंदी/तमिळ/कन्नड/तेलुगू/बंगाली वगैरे भाषक त्यांच्याच भाषेत बोलतात व इतरांनीही त्याच भाषेमध्ये बोलावे असा आग्रह धरतात. मात्र मराठी माणूस असा आग्रह इतर भाषकांसोबत तर सोडाच तर मराठी भाषकांसोबतही कधी धरत नाही'  मला पूर्णपणे पटते.  हे थोडेसे anecdotal असले, तरी ते पुरेसे प्रातिनिधिक आहे कारण मी राहतो त्या ठिकाणी मला भेटणारी मराठी माणसे काही वेगळे वैशिष्ट्य घेवून आली आहेत असे नाही.

कर्नाटक व महाराष्ट्रच का, संपूर्ण भारताचीच संस्कृती ही फारच एकजिनसी आहे ! राम आणि कृष्ण ही इथली दैवते आहेत आणि रामायण आणि महाभारत ही इथली महाकाव्ये! इथले संगीत , नाटक , लोककला या मध्यवर्ती संकल्पनेभोवती विकसीत झाल्या. एका राम नामाची ही विविध रूपे पाहा.... राम सिंग , रामजी, रामुभैय्या, रामचंद्रराव, रामाण्णा, रामन, ......!  .....वगैरे.

ही सगळी लक्षणे आपण हिंदू धर्माची सांगितली आहेत. असा हा हिंदू धर्म पार बालीपर्यंत पसरला आहे, कंबोडियातल्या अंग्कोर वाटची देवळे हिंदू धर्माची प्रतिके आहेत. बालीमद्ये विशेषतः हिंदू धर्माच्या चालीरितींचे बरेच पालन होते. 'आपण हिंदू का, मगतर आपण दोघे भाऊ-भाउ हे मी तिथे ऐकून मोहरून गेलो. तिथे रामायणातल्या काही भागांचे रोज प्रयोग (लोकनाट्याचे) होतात. पण मग हे आपले 'भारतियत्व' आपण थेट बाली व कंबोडियापर्यंत पोहोचवणार की काय? खरे म्हणजे धर्माच्या आचरणातून आलेल्या काही प्रथा, काही इतर गोष्टी सोडल्या तर भारतातल्या जनतेत काहीही एकजिनसी आहे असे मलातरी वाटत नाही.

केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातही भारत हा काही अपवाद (उदा. क्रिकेट सामने वगैरे) वगळता एकसंध देश म्हणून कधीच उभा राहिलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे

हे एकदम मान्य. विटेकरांनी पुराणातले हवाले दिले आहेत, पण गेल्या कित्येक शतकांचा इतिहास काय सांगतो? अनेक राजेमहाराजे, त्यांच्यात भाउबंदकी, त्यांचे आपापसात तंटेबखेडे, परकिय आक्रमणातही बाहेरून आलेल्या शत्रूला साथ देणे, हा आपला भारतियांचा इतिहास झाला.

"इंग्रजांच्या पूर्वी भारत हा एकसंध देश कधीच नव्हता हा एक सार्वत्रिक गैरसमज इंग्रजांनी करून दिला होता

ह्यात चूक काय आहे? इतिहासाचे बघूया, पुराणातली वांगी पुराणातच राहूदेत. इंग्रजांनी ह्या सर्व राजवटींना वचक बसवला, व त्यांच्याच राज्यात भारत एक एकसंध समाज(cohesive entity) झाला, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून कसे चालेल?

'अवघे विश्वची माझे घर'अथवा 'सर्वेपि सुखिनं संतु'  हे भारतीयांच्या विशाल /सर्वसमावेशक संस्कृतीचे द्योतक आहे. इतरांना तिथे पोचण्यास काही शतके जावी लागतील. ( हा अभिनिवेष नव्हे , केवळ परीस्थितीचे वास्तवदर्शी आकलन आहे)

एकतर ही विशाल वगैरे संस्कृति सगळ्या भारतवासियांची नाही. ही हिंदू धर्माची शिकवण आहे, ती तशीच्या तशी सर्व भारतीय जनता खुल्या मनाने मानते असे मानणे वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे आहे. दुसरे की हे सर्व तत्त्वतः सुंदर असले तरी जगरहाटीला त्याचा काही उपयोग नाही. एका तात्त्विक पातळीवर हे सर्व अप्रतिम आहे, पण एक देश म्हणून जेव्हा आपण इतर देशांशी व्यवहार करतो, तिथे ही तत्त्वे बाजूला ठेवलेली बरी.  शेवटी 'शिर सलाम तो पगडी पच्चास' हे महत्त्वाचे.

आपणापाशी आपल्या देशाबद्दल अभिमान नाही, हे एकदम मान्य. पण विभाजकतेची मूळप्रवृत्ति (propensity to divisibility) ही आपल्या नसानसात भिनलेली आहे. 'देश' ह्या संकल्पनेबद्दल उदासिन असणे, हा आपला मूळ गुणधर्म आहे. राजकारण्यांनी अनेक कारणांनी त्याला खतपाणीच घातले. तेव्हा सध्याच्या परिस्थितिततरी मला काही आशादायी वाटत नाही.