वर मटाच्या बातमीत राठिवडेकर म्हणतात तेही खरे आहे आणि खाली सकाळच्या बातमीचे अवतरण प्रसाद यांनी दिले आहे, तेही सत्य आहे. पण दोन्हीही अर्धसत्ये आहेत. खरी गोष्ट अशी आहे, की वाचनाचे आणि वाचकांचे केंद्र आता सरकले आहे. सकाळच्या बातमीत गोडबोले सांगताहेत तो मराठी माणूस मुंबई पुण्यातला उच्चमध्यमवर्गीय, मुलगा-नातेवाईक परदेशात असणारा तंत्रज्ञानाने देऊ केलेले सगळे मिडिया प्लॅटफॉर्म वापरणारा आहे. त्याला वाचायला मराठी(च) आणि पुस्तक(च) नको(च) आहे.
आजच्या मराठी वाचकाची प्रोफाईल काय, तर तो मुंबई पुण्यातील मध्यम- उच्चमध्यमवर्गीय वाचक नाही. तो आता सोलापूर-अंबाजोगाई-अकोला-वर्धा अशा इंटिरिअरमध्ये राहतो. शेती-शेतीपूरक व्यवसाय आणि गावागावात पोहोचलेल्या शासकीय नोकरी, कंत्राटे ही त्याची उत्पन्नाची साधने आहेत. घरातली बाई ही दुसरी पिढीची वाचनाची आवड असलेली साक्षर स्त्री आहे (भलेही ती मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी बाहेर पडली नसेल.) आपला म्हणजेच बहुजनांचा इतिहास, संस्कृती याचा या नव्या वाचकाला अभिमान आहे. त्याबरोबरच विज्ञानाने आणलेल्या न्यू इकॉनॉमीचं त्याला कुतूहल आहे, त्यात सहभागी होणं त्याला नक्कीच आवडणारं आहे. तो पूर्वीच्या वाचकांसारखा फार भावनाशील किंवा कल्पनाविश्वात अति रमणारा मात्र नाही. कल्पनेची नाळ वास्तवाशी जोडलेली त्याला आवडते. मुख्य म्हणजे, वरच्या एका प्रतिक्रियेच्या विपरित, तो पुस्तकं विकतच घेत नाही, तर वाचतो देखील. आसपासच्यांनीही वाचावं असा त्याचा प्रयत्नही असतो.