मी कुणी अधिकारी नाही..पण मला समजल्याप्रमाणे..हा एक उपमा अलंकार आहे. उपमा अलंकार हे एक जनरीक स्टेटमेंट असते, त्यात अपवाद असू शकतात! ( तिचे वदन चंद्राप्रमाणे आहे .. असे म्हणताना अमावस्येचा चंद्र अपेक्षित नाही! ह. घ्या.)

ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाल्यावर टाकून देऊन नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून जातो.

श्लेषार्थ: आत्मा जुना/ मलीन होत नाही, शरीर टाकाऊ आहे! आत्मा अविनाशी आहे. त्याच्याच पुढचा श्लोक नैनं छिदंती... आत्म्याच्या अमरत्वाबद्दल आहे.

विनोबांचा समश्लोकी अनुवाद माहितीसाठी देत आहे:

सांडुनीया जर्जर जीर्ण वस्त्रे/मनुष्य घेतो दुसरी नवीन

तशीच टाकुनी जुनी शरीरे/ आत्मा ही घेतो दुसरी निराळी    

 आणि

शस्त्रे न चीरती यांस / यांस अग्नि न जाळितो

पाणी न भिजवी यांस/ यांस वारा न वाळवी

तेव्हा हे संपूर्ण प्रतिपादन आत्म्याच्या संदर्भात चालले आहे, त्यामुळे श्लेषार्थ हा आत्म्यासंदर्भातला आहे.

अवांतर : ज्ञानेश्वरीत तर अशा उपमा अलंकारांची रेलचेल आहे. इतके की, भावार्थापलिकडे आपण भाषेच्या सौंदर्यातच हरवून जातो.