ही अगदीच बिनबुडाची चर्चा आहे. केवळ ब्राह्मणांमधला हा संस्कार आहे म्हणून त्याची चर्चा! पहिले वाढदिवस थाटा-माटात साजरे केले जातात, लग्न थाटा-माटात केले जातात, घरात सत्यनारायणाची पूजा भक्तीभावाने केली जाते, मुस्लिम लोकं पाच वेळा नमाज पढतात, दाढी वाढवतात, सुरमा घालतात, शीख लोकं अजूनही कृपाण बाळगतात, दाढी वाढवतात, पगडी घालतात, डॉ. आंबेडकरांची जयंती दणक्यात साजरी केली जाते, त्यावेळेस आठ-आठ दिवस रस्त्यांवर मांडव टाकून मोठ्या-मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात, गणेशोत्सव, नवरात्र दहा-दहा दिवस साजरे केले जातात, जन्मानंतर बारसे थाटात केले जाते, पाचवीची पूजा दिमाखात घातली जाते, ऊरूस होतात, मोठे मोठे लंगर घातले जातात, तीर्थयात्रेसाठी लोकं अमाप पैसा खर्च करतात, मृत्यूनंतर अग्निदाह दिला जातो, तेरावे-चौदावे घातले जाते, श्राद्ध घातले जाते, कुलाचार होतात, आधीच गच्च पोट भरलेल्या ब्राह्मणांना आग्राहाने जेवू घातले जाते, अभिषेक केले जातात, डोहाळजेवणे घातली जातात, मंदिरांमध्ये भंडारे घातले जातात, नवस-सायास केले जातात, फेडले जातात, जैनांमध्ये संथारा घेतात, खम्मतखामणा करतात, चातुर्मासात उपवास करतात, मुस्लिम रोजे पाळतात, शिवजयंती (केवळ एकच नव्हे, दोन-तीन!) साजरी केली जाते (आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसारखी आदरणीय संस्था तुडवली जाते, शिवाजीमहाराजांचे एकमेव आदरणीय गुरू श्री रामदास स्वामींवर चिखलफेक केली जाते. होय, हे देखील संस्कारच!), लहान बाळाचे कान टोचले जातात, जावळे काढले जाते, दसरा, दिवाळी साजरे होतात, ईद साजरी होते, ख्रिसमस साजरा केला जातो......... ही यादी न संपणारी आहे. मुंजीपेक्षाही कितीतरी सध्याच्या जगात निरर्थक वाटणारे, उपद्रव देणारे संस्कार, सण, प्रथा पाळल्या जातात. त्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही. केवळ ब्राह्मणांचा संस्कार आहे म्हणून घ्या तोंडसुख असला हा प्रकार आहे. त्यामुळे मूळातच या चर्चेला काहीच अर्थ नाही. माझी मुंज झाली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आज किती संस्कारांचे (कुठल्याही जाती-धर्माचे), प्रथांचे, सणांचे, उत्सवांचे जुने संदर्भ आणि अर्थ शाबूत आहेत? कुठल्याच नाही. मला स्वतःला मुंज हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार वाटतो. कुठलेही करू नये असे काम करण्या आधी (चुकून मोह झाल्यास, तो सहसा होत नाही हा पण संस्कारांचा भाग!) आठवते की आपले संस्कार काय आहेत आणि आपसूकच मनावर ताबा, संयम ठेवला जातो. मान्य आहे की आताच्या जगात किती गोष्टी पाळल्या जातात हा वादाचा मुद्दा आहे पण मग इतर सगळ्याच जातीच्या, समाजाच्या संस्कारांची, प्रथांची, धारणेची, जुन्या चाली-रीतींची थोड्या-बहुत प्रमाणात अशीच अवस्था आहे. निदान मुंज दुसऱ्याला त्रास तर देत नाही? दुसऱ्यांना त्याचा उपद्रव तर होत नाही? मुडदे पाडायची शिकवण तर देत नाही? मग कशाला उगीच गळे काढून निरर्थक चर्चा करायच्या? उलट मी तर म्हणेन मुंज हा एक अतिशय सात्त्विक आणि पवित्र संस्कार आहे. त्याचा अर्थ खूप सुंदर आहे. इतरांना कमी लेखण्याचा, त्रास देण्याचा असा चुकीचा प्रघात त्यामुळे खचितच पडत नाही जो इतर बऱ्याच गोष्टींमुळे पडतो. आपले सगळे सण, उत्सव, संस्कार, धार्मिक गोष्टी यांचा फार मोठा संबंध कितीतरी लोकांच्या उपजीविकेशी ही जोडलेला आहे. अशा संस्कारांमध्ये, उत्सवांमध्ये, यात्रांमध्ये कित्त्येक बाबींवर खर्च होतो असतो ज्यावर लाखो-करोडो लोकांचे पोट भरले जात असते. प्रवास, जेवणावळ, आचारी, जिन्नस, कापड खरेदी, सामानाची वाहतूक, विविध वस्तूंची विक्री, सजावटींचे कंत्राट, कार्यालयाचे भाडे असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या कितीतरी लोकांची उपजीविका या गोष्टींवर अवलंबून असते. जर अशा समारंभातून जर अर्थशास्त्राचा एक मोठा भाग पार पडत असेल आणि अशा समारंभांमुळे कुणाची दिडकीचेही नुकसान होणार नसेल, कुणाला उपद्रव होणार नसेल, हाणामारी होणार नसेल, दारू पिऊन दंगा होणार नसेल, उगीच दादागिरी आणि दमदाटी होणार नसेल तर हरकत काय आहे? शिवाय या गोष्टींचा चांगला परिणाम होतोच. लोकं एकमेकांच्या अधिक जवळ येतात, त्यांच्यातला दुरावा कमी होतो, व्यापार-उदीम वाढतो आणि एकूणच प्रगती होते. शिवाय हे प्रकार जगभर हजारो वर्षांपासून चालत आहेत. आणि अजूनही टिकून आहेत किंबहुना वाढत आहेत. याला काहीतरी तर सबळ तार्किक कारण असेलच, नव्हे वर नमूद केले आहेच. मग असली बिनबुडाची चर्चा मांडून काय उपयोग? त्यापेक्षा काहीतरी विधायक मुद्द्यावर चर्चा घडवून आणि त्यातून काहीतरी सगळ्यांच्या भल्याचे साधणे जास्त शहाणपणाचे नाही काय? अजून किती वर्षे आपण फालतू मुद्द्यांवर तोंडाची वाफ घालवून आप-आपसातच दुही माजवणार आहोत आणि स्वतःच्याच प्रगतीला खीळ पाडणार आहोत?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

-- समीर