नमस्कार,
मी सूज्ञ, विचारी, जाणकार इत्यादी नसलो तरी माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतो.

वरील प्रतिसादात विटेकर म्हणतात त्याचप्रमाणे श्लोकाचा अनुवाद करावा असे वाटते.
ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाल्यावर टाकून देऊन नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून जातो.

या वरुन जिवात्मा शरीर रुपी वस्त्र कसे सोडतो ते समजेल. आता प्रश्न राहिला की तो तसे का करतो?
आपण विचारता की,

आतां शंका अशी कीं, जेव्हां एकादा २२ / २३ वर्षांचा तरणाबांड तरूण, अथवा एकादे नवजात बालक जन्मल्याबरोबर स्वर्गवासी होते त्यावेळी हा आत्मा अशी कोरी करकरीत शरीरे कां टाकून देतो.

या वर मला असे वाटते की 'कर्माचा सिद्धांत' येथे योग्य तो प्रकाश टाकेल.
समर्थ रामदास म्हणतात की
सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश
ढळता न ढळता निमिष, जाणे लागे.

येथे मला आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे असे वाटते. जीवात्मा हा काही विशिष्ट भोग भोगण्यासाठी एका विशिष्ट काळात, विशिष्ट समकालिन लोकांत, शरिर धारण करतो. त्या शरिराकडून तो त्या परिस्थितीमध्ये भोग भोगतो. ते भोग संपले की नव्याने निर्माण झालेल्या कर्मांची फळे आणि मागील अफलित कर्मफळे संचित रुपाने तो जवळ बाळगुन तो नव्या योग्य परिस्थितिच्या शोधात (ज्यात काळ व शरिर दोन्ही आले) पुढे जातो. या मध्ये परिस्थिती निवडिचे स्वातंत्र्य हे त्या जीवाच्या मनावर वलंबून नसून ते या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून घडते. यालाच लोक देवाची इच्छा अथवा ऋताचे नियम असे म्हणतात.

आपला,
--(अल्पमती) लिखाळ.