भटकण्याच्या सवयीमुळे काही चमत्कारिक स्थळांचे दर्शन झाले. एक म्हणजे पुण्यापासून २० किमि अंतरावर शिवापूरचा कमर अली दुर्वेश दर्गा. तिथे ९० किलोग्रॅम वजनाचा दगड आहे. अकरा पुरुषांनी केवळ एका बोटाचा स्पर्श करून "दुर्वेऽऽऽश" असा आवाज काढायचा. आवाज जितका वेळ टिकेल तितका तो दगड वर उचलल्या जातो. आठ फुटांपर्यंतसुद्धा गेलेला मी पाहिला आहे. फोटो व व्हिडियो शुटिंग घेतले आहे.
त्याहीपेक्षा चमत्कारिक स्थळ आहे गडचिरोली जिल्ह्यात आंध्र-सीमेला लागून प्राणहिता नदीच्या किनारी, अवलामरी गावाजवळ. तिथे जंगलात सात कुंडे आहेत. पोचायला उशीर झाल्यामुळे आम्ही केवळ एकच कुंड बघू शकलो. कुंड म्हणजे अगदी डबके म्हणावे इतके १०-१२ फूट लांब-रुंद आणि २-३ फूट खोल. डबक्याच्या तळाशी बारीक पिठासारखी वाळू आहे आणि सतत भूगर्भातील पाणी वर येत असतं. एका बाजूच्या लहानशा कालव्यातून ते पाणी वाहून जातं. पाण्याला गंधक आणि इतर खनिजांची चव आहे.
चमत्कार असा की एरवी अगदी शांत असलेले ते डबके आपण तिथे आवाज करताच 'उकळायला' लागते. म्हणजे पाण्याचे तापमान वाढत नाही. पण तळाची वाळू आणि पाणी उकळी फुटल्याप्रमाणे उसळायला लागते. आवाज बंद केल्यास डबके पुन्हा शांत होते. आवाजाच्या पट्टीवरसुद्धा त्या उकळीचा वेग अवलंबून असल्याचे लक्षात आले.
तो भाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे आणि रस्ता अतिशय दुर्गम असला तरी सुंदर आहे. प्राणहितेचे भव्य पात्र सतत सोबत करीत असते. http://www.newsforthesoul.com/raj.htm ह्या वेबसाईटवर त्याची माहिती आणि सोबतच व्हिडियो देखील दिला आहे.
त्याच्या अलिकडे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला मार्कंडा देव हा मंदीर-समूह तेथल्या अप्रतिम शिल्पांसाठी अवश्य बघण्यासारखा आहे. जवळच ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.
-राजेन्द्र