१. हे जे काही होत आहे, ते फक्त विदर्भातच का? यापेक्षा ते "विदर्भातच घडते आहे" हे महत्त्वाचे आहे. आता तुमची मागासलेपणाची व्याखा मला कळली तर बरे होईल. त्यानुसार कोंकण, मराठवाडा व विदर्भ यात कोण तुमच्या मताप्रंमाणे मागासलेले आहे ते ठरविणे सोपे जाईल.
एखाद्या प्रांतातील जनता जितकी दारिद्रामद्ये जास्त पिचत असेल, तितका तो प्रांत इतरांच्या तुलनेने अधिक मागासलेला. मी काही अर्थतज्ज्ञ नाही, त्यामुळे मी काहीही आकडेवारी व सांख्यिक निकष (benchmarks) देऊ शकत नाही, हे खरे. पण सर्वसामान्यापणे महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे जिल्हे आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहेत, व त्या तुलनेने अहमदनगर, मराठवाडा व सर्वच कोंकण मागासलेला समजला जातो, ह्याबद्दल मला वाटते काही वाद नसावा. पण हे जर आपल्याला मान्य नसेल तर आपण कृपया सांगा की काय निकष वापरलेले पाहिजेत, व त्या benchmarks वरून कोंकण, मराठवाडा, विदर्भ व सातारा, सांगली वगैरे कुठे बसतात?
यापेक्षा ते "विदर्भातच घडते आहे" हे महत्त्वाचे आहे.
तोच प्रश्न मी आपल्याला विचारला. प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय त्याचा इलाज करणे शक्य नाही. वरवरची मलमपट्टी होत राहिल, पण ती काही खरी नव्हे. आपणाकडेही ह्या प्रश्नाचे उत्तर आहे असे मला आपल्या ह्या प्रतिसादातून वाटत नाही.
२. शहरांची आर्थिक स्थिती खेड्यांपेक्षा नक्कीच चांगली आहे, आणि तसं नसते तर शहरं दररोज अशी "फुगत" चालली नसती, यात तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमचे २ वर्षापूर्वीचे शहर आणि आजचे शहर यात जरा तुलना करून पाहा. तुमची कर्जे घर, गाडी, यांसाठी असतील, शेतकऱ्याची कर्जे जगण्यासाठी असतात..
शहरांची व खेड्यांची सरसकट आर्थिक परिस्थिती हा आपला वादाचा विषय नाही. मी शहरी माणसाचे अडाणी प्रश्न असे म्हटले ह्याचे कारण एव्हढेच की आपल्या लिखाणातून शेतकऱ्यांचे प्रश्न इतके टोकाचे का होतात की त्यांना आत्महत्या करावीशी वाटते, हे मला शहरी दृष्टिकोनातून कळत नाही, जसे ग्रामीण जनतेला शहरवासीयाचे, विशेषतः झोपडवासियांचे प्रश्न कळणार नाहीत. ही माझी मर्यादा झाली, व मी ते आपल्यापुढे उघड करून मांडली.
शहरांची आर्थिक परिस्थिती व तुलनेने ग्रामीण मंडळींची आर्थिक परिस्थिती हा मुद्दा खरे तर गैर आहे. पण त्याचे कारण कदाचित मी दिलेले शहरवासीय दुकानदाराचे असू शकेल. तेव्हा मला ते उदाहरण थोडे दुसऱ्या तऱ्हेने देऊ द्या. तो जो मी दुकानदार उल्लेखिला, तो शहरातला न समजता एखाद्या गावातला समजा. त्याच्या धंद्याचे प्रश्न व शेतकऱ्यांच्या धंद्याचे मूलभूत प्रश्न तेच आहेत का? आजूबाची बदलणारी परिस्थिती, उपलब्ध साधनांची कमतरता इत्यादी व त्याबद्दल हे दोघे घटक किती दखल घेतात? दोघांचीही जीवने त्यांच्या त्यांच्या धंद्यावर अवलंबून आहेत.
शहरांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली दिसते ती समाजाच्या वरच्या थरांच्यामुळे. झोपडपट्टीवासिय, रोजगारावर काम करणारे अनेक लोक, घरबांधणीच कामावर असलेले अनेक भटके लोक, हमाल, असंघटित मजूर ह्या सर्वांची परिस्थिती शेतकरऱ्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप चांगली आहे, असे मलातरी वाटत नाही.
तुमची कर्जे घर, गाडी, यांसाठी असतील, शेतकऱ्याची कर्जे जगण्यासाठी असतात
वर मी लिहिल्याप्रमाणे, मी कुठल्याही कर्जाविषयी बोलत नव्हतो. एका दुकानदाराचे जे उदाहरण दिले, ते त्याच्या धंद्याच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे होते. इतरही अनेक सर्वसामान्य शहरी व ग्रामीण जनतेतील माणसे आपापल्या धंद्यासाठी / उद्योगासाठी कर्जे काढतात, व अशा सर्व कर्जात कमी अधिक प्रमाणात धंदा/ व्यवसाय काही कारणांमुळे बुडित जाण्याची शक्यता असते. थोडक्यात, शेतकऱ्यांच्यासाठी काही विशेष दराने कर्जे द्यावीत अथवा ती सरसकटच माफ करावीत असे त्या धंद्यात काय आहे, हे मला प्रामाणिकपणे जाणून घ्यावयाचे आहे. न चिडता, proactrive चर्चा व्हावी ही अपेक्षा. आमचे/ तुमचे असे नको, कारण तश्यामुळे मग ही चर्चा कोठेही पोहोचू शकणार नाही.