आपल्याला जो स्वतंत्र विदर्भाचा इलाज अभिप्रेत आहे, तोतरी किती शास्वत आहे? कारण तिथेही राजकिय मंडळी आपले भले करून घेणारच. व मग त्या स्वतंत्र विदर्भातही अशा तऱ्हेने दुफळी पडायला वेळ लागणार नाही. मग नागपूर एका बाजूला, व इतर ग्रामिण विभाग दुसऱ्या, असे होणे सहज शक्य आहे. खरे म्हणजे, तुम्ही- आम्ही हा लांबचा विचार शांतपणे केला, तर असे लक्षात येईल की दुफळी हा काही चांगला इलाज होवू शकत नाही.

मुंबई-पुणे एका बाजूला, व इतर विभाग दुसऱ्या, हे वरवर पाहता जरी खरे असले (उदा. वीजकपात मुंबईला अजूनही लागलेली नाही), तरी त्यामागे महाराष्ट्राच्या नादान राज्यकर्त्यांना काही ह्या शहरांचे विशेष प्रेम आहे, असे मुळीच नाही. मुंबई ही त्यांच्या दृष्टिने फक्त एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. राज्याच्या उत्पन्नापैकी बहुतांशी उत्पन्न मुंबई-पुणे-नाशिक ह्या विभातातल्या उद्योगधंद्यावर व व्यापारउदिमांवर अवलंबून आहे. तेव्हा ही शहरे शक्य तितक्या 'सुऱळीतपणे' चालू ठेवण्य्यात त्यांचा मतलब आहे.

आणि सुरळीत म्हणजे काय? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मुंबई ह्या शहरातील बहुतांश लोक कसे किडामुंगीपेक्षा वाईट जीवन जगतात? लळत, लोंबकळत लोकलचा प्रवास रोज का व कसा करतात? रोज किती माणसे लोकलखाली चिरडून मरतात? आज घराबाहेर कामासाठी पडलेली व्यक्ति जिवंतपणे घराकडे येईल, ह्याची शास्वती मुंबईकर केव्हाच विसरून गेले आहेत. हया शहरातील 'सुविधा' काय आहेत व त्या कोणत्या प्रतिच्या आहेत? मेट्रो रेल्वेची जरूर मुंबईला होती का कलकत्त्याला? मला आठवते, १९७५ साली मुंबईत मेट्रो होणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. पण पुढे काय झाले? अजून ना धड प्रवासाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध, ना पाण्याच्या, ना रस्त्यांच्या! 'तीन दिवस 'मेगाब्लॉक आहे, म्हणून कल्याण स्टेशन बंद राहिल'! ही येथली सत्य परिस्थिती!

मी मुंबईचा ह्याबद्दल मला कसलीही लाज वाटत नाही. व आजकाल मी मुंबई- महाराष्ट्रात, एव्हढेच नव्हे, तर भारतातही राहत नाही, ह्याबद्दलही मला कसलीही लाज वाटत नाही. हे खरे की मी विदर्भात राहात नाही, व म्हणून मला तेथील प्रश्नांचा अनुभव नाही. पण आत्मियता जरूर आहे, म्हणूनतर सचिनजींना मी काही प्रश्न विचारले. आपण तिथल्या आपल्या अनुभवांविषयी जरूर लिहावे.