कविता महाजनांच्या लेखाकडे जाणारी वाट दाखवल्याबद्दल धन्यवाद. लेख मस्तच लिहिला आहे त्यांनी. विशेषतः सुरुवातीचे 'गोची' प्रकरण. :-)
आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे:
ग्लोबल वॉर्मिंग ,इराणचे युद्ध, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, घुसखोरी,
पुरुष लेखक-कवींच्या लेखनातही हे विषय फार सातत्याने येतात असे वाटत नाही. स्त्री लेखिकांना 'सामाजिक प्रश्नांवर' लिहायचे झाले तर स्त्रियांच्या समस्याच इतक्या आहेत की त्यातून बाहेर पडून दुसरे काही करता येत नसावे. शिवाय पुरुषांनी समग्र (म्हणजे स्त्रियांना फार महत्त्व न देता) विचाराने लिहावे तर स्त्रियांनी समस्येतील केवळ स्त्रीविषयक कंगोऱ्यांना दाखवावे असा प्रघात पडला आहे असेही वाटते.
लिहिणारी व्यक्ती तिचे स्वतःचे अनुभवच लिहीते असे इथे वाचकांना अथवा लिहिणाऱ्या सदस्यांना वाटते का?
मला असे वाटत नाही. लिहिणारी व्यक्ती स्वतःचे अनुभव लिहित नसली तरी जिव्हाळ्याच्या विषयावर लिहित असावी असे मात्र वाटते. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा, व्यक्तींचा, घटनांचा विचार करतो, त्यावर आपण लिहू, असे.
नैतिकता दर्शवण्यास वेगळे नियम आहेत का?
'नियम' असे जरी नसले तरी 'धाडसी' लिहिणाऱ्या लेखिकांचा स्पेशल उल्लेख केला जातो, तसा धाडसी लेखकांचा केला जात नाही. म्हणजे नियम नसले तरी समाजभीरू लेखिका आपले लेखन नैतिकतेच्या चाकोरीबाहेर जाऊ देत नाहीत.
पुरूष जेवढा नि:संकोचपणे प्रेमाच्या विविध रूपांचे आणि स्त्रीचे वर्णन करतो तसे स्त्रिया का करत नाहीत?
वरच्या वाक्याप्रमाणेच. नैतिकतेच्या जागी समाजमान्य सभ्यतेचे संकेत, इतकेच.
पौराणिक संदर्भ
बहुतेक संदर्भ पुरुषप्रधान संस्कृतीतले म्हणजे स्त्रियांच्या गुलामगिरीचे समर्थन करणारे असतात. त्यामुळे स्त्रियांनी ते देण्यात काहीच अर्थ नाही. वर्तमानतले समानतेचे संदर्भ सापडले तरी पुष्कळ होईल.