या कवितेचे गद्यात रूपांतर करून त्याचे विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न.
अग्नीमय पाय असणारा बैरागी वैशाख चालतो आहे, त्याने अंगाला राख फासली आहे आणि तो आभाळाला जाळतो आहे.
आग भास्कर ओततो आहे आणि त्यात वैशाख झळाळतो आहे, पिंपळाच्या लाल पानात उन्हाळे चमचमत आहेत. अग्नीमय पायाचा वैशाख आहे पण आग भास्कार ओततो आहे.....(वाचकाला भोवळ आणणाऱ्या कल्पना आहेत, ह्या कवितेत. )वैशाखाच्या ज्वाळा केशरी आहेत, त्याच्या जिभा लवलव होत आहेत. (इथे ज्वालाना जिभा म्हणायचे असावे) नाहीतर लाल फुलांनी काय पेटणार? कोणती लाल फुले? पळसाची की अग्नीची...जिभा कशाने पेटतात? ....

बरे नंतर येणारी दोन कडवी वाचाकाला अर्थ लावायला सोपी आहेत. त्यानंतर वैशाखाचे ऋण थेंबाथेंबाने फिटेल.. हे समजले. आता मृगाचे ग्रहण कोणते? 

 उन्हाळा वैशाख महिन्याचे वैशिष्ट्य की ग्रीष्म ऋतूचे? रोज राणा विशाखेचा? म्हणजे नक्की कोण? विशाखा हे नक्षत्र आहे. आता विशाखा आणि वैशाख यांची सरमिसळ होते आहे असे वाटत नाही का? आपल्याला शक्य असेल तर या कवितेतील तर्किकता समजवून सांगा, आकलनशक्तीबाहेर वाटली.

जेष्ठ आषाढ झाल्यावर श्रावण येतो .. मग लगेच श्रावण खलिते कसे येतील?..

आता तुझे श्रावण खलिते म्हणजे नक्की कोणाचे? श्रावण खलिते म्हणजे पावसाच्या सरी असतील तर हा तू म्हणजे नक्की कोण? पाऊस? नभ?की प्रियकराच्या विरहाने भाजून निघणारी प्रेयसी त्याचेच पत्र यावे असे म्हणते आहे? वाचकाला  संबंध लावता येईल असे लेखन असेल तर नव्या कल्पना, नवे शब्द, नवी रचना यशस्वी झाली अन्यथा वाचक आणि लिहिणारा यात काही संवाद नाही असे वाटते.