गझलांमधे वापरण्यात येणारी वृत्ते पाहिली तर त्यांच्यात एक प्रकारची लय ताल किंवा ठेका असतो, असे वाटते. (.. अर्थात असा काही नियम किंवा बंधन नसावे.) शिवाय लघुगुरुक्रम हा पुनरावर्ती असल्याचे दिसते उदा. भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा. आनंदकंद - गागालगालगागा - गागालगालगागा किंवा (नाव?) गालगागा  गालगागा गालगागा गालगागा. अशा पुनरावर्तनाने आणि लयीने त्यांत एक प्रकारची सहज आकलनसुलभ अशी गेयता येत असावी, त्यामुळे त्यांत केलेली रचना ऐकताना श्रोत्याला अन्वय समजून घ्यायला तुलनेने कमी श्रम पडत असावेत.
अतिशय चांगले निरीक्षण आहे. काही वृत्तांत अशी आकलनसुलभ गेयता असावी.

त्यामुळेच काही अक्षरगण वृत्ते गझल लिहिणाऱ्यांत लोकप्रिय असावीत.
१. भुजंगप्रयात (यमाचा, यमाचा, यमाचा, यमाचा )
२. किंवा दुसरे वेरियेशन यमाचा, यमाचा, यमाचा, यमा
(सुमंदारमाला भुजंगप्रयातीचेच वेरियेशन वाटते. सुमंदारमाला = भुजंप्रयाती य ये चार वेळा, यमाचा यमाचा यमाचा यमा' म्हणजे २xभुजंगप्रयात-गा)
२. ताराप, राधिका, गा | ताराप, राधिका, गा हे वृत्त ( 'सारे जहाँसे अच्छा हिदोसताँ हमारा' किंवा 'केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली')
३. राधिका, ताराप, गागा | राधिका ताराप गा हे आणखी एक वेरियेशन.
४. वरील वृत्ताचे शेवटी एक गुरू कमी असणारे आणखी एक वेरियेशन राधिका, ताराप, गागा | राधिका, ताराप, गा
५. आणखी एक वेरियेशन (राधिका ताराप गा | ताराप गा
५. हिरण्यकेशी (जनास, ताराप, राधिका, गा | जनास, ताराप, राधिका, गा किंवा जनास गागा चार वेळा)
६. जनास गा, जनास गा, जनास गा, जनास गा हे वृत्त (मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो)
७. ताराप गा, ताराप गा, ताराप गा, ताराप गा (विसरून जा, विसरून जा, तुजलाच तू विसरून जा)
अजूनही काही वृत्ते आहेत. पण साधारणपणे वर नमूद केलेल्या वृत्तात गझलकार रचना करतात असे दिसते.

शार्दूलविक्रीडित त्यामानाने अधिक ओबडधोबड (?) आहे. ते गद्याच्या अधिक जवळ जाणारे आहे.
हे आहे खरे. शार्दूलविक्रीडिताची मराठी कानांना अजून सवय नाही म्हणूनही तसे वाटत असावे. 'सातत्याने शार्दूलविक्रीडितात उत्तम गझला करत गेल्यास त्याचाही काही काळाने पायंडा पडेलच!,' असे मलाही वाटते. शार्दूलविक्रीडित हे अगदी जुन्या जमान्यातले वाटते. पण 'ते आम्ही परवाङ्मयातुन करू चोरून भाषांतरे' ह्या ओळीतली सहजता बघितली तर शार्दूलविक्रीडितात उत्तम गझला लिहिता येतील असे वाटते. अत्र्यांनी उत्तम गझल लिहिली असती यात मुळीच शंका नाही.