सर्वप्रथम हे प्रश्न जाहीरपणे विचारल्याबद्दल अभिनंदन.
त्यानंतर याचे इतके चुकीचे रसग्रहण(!) केल्याबद्दल आपल्याला काही प्रश्न
१) वैशाखावरील कवितेत वैशाखाबद्दल निरनिराळ्या कल्पना एकत्र मांडल्यास आपल्याला काही हरकत आहे का?
२) माझी कविता ही कविता आहे. निबंध नाही. त्याचे नवनीत अर्थात गाइडमध्ये ज्या पद्धतीने कवितेचा अर्थ सांगतात तशा स्वरूपाचे गद्य रूपांतर केल्यास त्यातली सौंदर्यस्थळे कशी समजणार?
३) कविता म्हणजे शब्दांना(क्वचित माणसांनाही ) शिस्त लावायची गोष्ट नाही किंवा शब्दांचा शारीरिक शिक्षणाचा तासही नाही. त्यामुळे इथे २+२ = ४ च होतील अशी अपेक्षा कृपा करून ठेवू नये. प्रत्येक शब्दामागे तार्किक आणि सुस्पष्ट असे तर्क असतातच पण ते सतत एकसारखे असावेत किंवा तुमच्या मनात जसे असतील तसेच माझ्या मनात असावेत असे आपल्याला का वाटते?
४) कवितेत तू कोण असतो हे कवीच्या आणि वाचकाच्या मतेही वेगवेगळे असू शकते त्यामुळे हा 'कोण ते लिहा' हा प्रश्न एकच उत्तर घेऊन आला तर कवीची जरा निराशाच व्हायला हवी नाही का?
आता आपल्याला न समजलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण
वैशाख बैरागी आहे आणि त्याचे पाय आगीचे आहेत. त्यामुळे तो जिथे जातो तिथे वैशाख वणव्यात बरेच काही भस्मसात होते आणि योगी लोक जशी आपल्या आसक्तीच्या विषयांची राख अंगावर फासतात तसाच तो त्या वणव्याची राख अंगावर मिरवतो अशी कल्पना आहे. वैशाखाचे पाय आगीचे आहेत कारण वैशाख म्हटलं की आग, उकाडा, लाहीलाही, असह्य तापमानामुळे होणारा उष्माघात या अवस्था माझ्या डोळ्यासमोर येतात.  हा उष्मा इतका प्रखर आहे की आभाळही त्यात जळत आहे असं वाटावं. अशी कल्पना आहे.
आता भास्कराच्या आग ओकण्याकडे वळू या. अग्नी ही कोणा एकाचीच मक्तेदारी नसावी कारण तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रज्वलित असू शकतो. मग वैशाखाचे पाय अग्नीमय असले की इतर सगळ्या ठिकाणचा अग्नी नष्ट व्हावा काय?
सूर्य हा मूर्तिमंत आगीचा गोळा आहे आणि त्याच्या उन्हाने वैशाखात अक्षरशः चटके बसतात. त्यामुळे उन्हाऐवजी तो आगच ओततो आहे की काय असा मला प्रश्न पडला आहे.
वैशाखातल्या नुसत्या कल्पना वाचूनच तुम्हाला भोवळ येत असेल तर तुम्ही बरोबर एक कांदा आणि कोलन वॉटरची एक बाटली घेऊनच यातायात करावी हे उत्तम! आणि हो. नागपुरात घालतात तशी पागोटी वापरल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होईल असे वाटते...
कमॉन जीजि.. यात तुम्हाला न समजण्यासारखं काही नाही हो! यू कॅन डू बेटर दॅन धिस!
आता पुढे वळू या
आता अशी कल्पना केली आहे की वैशाख हीच एक ज्वाला आहे. आणि या ऋतूचे वैशिष्ठ्य म्हणजे गुलमोहोरापासून ते अगदी मार्च लिलीपर्यंत सर्वत्र फुलणारी लाल फुले. गुलमोहोराची फुले म्हणजे रानात पेटलेली आगच आहे असे लांबून वाटते म्हणून याला आगीचे झाड असं इंग्रजी भाषेत म्हणतात हे तुम्ही जीवशास्त्राच्या आठवीच्या पुस्तकात शिकलाच असाल. असं असताना लाल फुले कोणती अस प्रश्न का पडावा? आणि वैशाखाच्या ज्वालेचं प्रतीक रानात फुललेल्या लाल फुलामध्ये दिसतं, एवढंच नाही तर ज्वालांच्या लवलव करणाऱ्या जिभांसारखीच (हो अग्नीनारायणाच्या केशरी ज्वाळा म्हणजे त्याच्या हजारो जिभा आहेत ज्यांनी तो आहुतीचा आस्वाद घेतो हा पुरातन आणि प्रस्थापित समज आहे) ती फुलंही वाऱ्यावर हलताना दिसतात अशी कल्पना समजायला अवघड नसावी असं वाटतंय. स्पष्ट बोलते म्हणून राग मानू नका पण ही शंका म्हणजे अगदी काढायची म्हणून काढल्यासारखी वाटली मला.
आता पुढचा प्रश्न! वैशाख हा एक दुष्ट पाषाणहृदयी सावकार आहे. पावसाळ्यात मुक्त हस्ताने दिलेलं पाण्याचं कर्ज तो वसूल करतो आहे. कृपण सावकाराने आपल्या अशिलाकडून पै न पै पिळून काढावी तसा तो थेंब न थेंब पिळून काढतो आहे. एकेका थेंबाने त्याचं कर्ज फिटतं आहे.
आणि जोवर हे कर्ज फिटणार नाही तोवर मृगात काय पडणार? म्हणजेच मृगाला जणू ग्रहण लागलं आहे आणि ते  वैशाख सोडवणार आहे. कसे ते सांगायची आवश्यकता आहे का? इयत्ता तिसरीच्या शास्त्राच्या पुस्तकातले जलचक्र आठवा म्हणजे कमी त्रास होईल....
"उन्हाळा वैशाख महिन्याचे वैशिष्ट्य की ग्रीष्म ऋतूचे? रोज राणा विशाखेचा? म्हणजे नक्की कोण? विशाखा हे नक्षत्र आहे. आता विशाखा आणि वैशाख यांची सरमिसळ होते आहे असे वाटत नाही का? आपल्याला शक्य असेल तर या कवितेतील तर्किकता समजवून सांगा, आकलनशक्तीबाहेर वाटली."
आपल्या सामान्यज्ञानाची खरोखर कमाल वाटते. आपल्याला वैशाख महिना कधी येतो हे माहीत आहे? त्याला वैशाख हे नाव का मिळालं हे माहीत आहे? विशाखा या शब्दाचा अर्थ माहीत आहे? विशाखा म्हणजे काय हे कदाचित नसेल माहीत पण मराठी महिने आणि मराठी ऋतू हे तर माहीत असायलाच हवेत ना! मग कळेल उन्हाळा ग्रीष्म ऋतूचे वैशिष्ट्य आहे की वैशाख महिन्याचे!
राहिला प्रश्न विशाखेच्या राण्याचा. वैशाख शब्दाची व्युत्पत्ती तर माहीतच असेल. वैशाखात चंद्र पौर्णिमेला विशाखा नक्षत्राच्या खूप जवळ असतो. भारतीय महिन्यांची नावे पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राजवळ असतो त्या नक्षत्रावरून ठरतात. त्यामुळे विशाखा आणि वैशाख यांचा जवळचा संबंध आहे. सरमिसळ नाही.
विशाखा म्हणजे राधा. म्हणूनच तिच्या नंतर येणाऱ्या नक्षत्राचे नाव (राधेच्या नंतर येणारी ती) अनुराधा असे आहे. विशाखेचा राणा म्हणजे वैशाख असाही अर्थ होऊ शकतो आणि राधारमण म्हणजे श्रीकृष्ण असाही अर्थ होऊ शकतो. पहा पटतंय का ते. ही कविता म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅम नाही त्यातली तार्किकता एखाद्या अल्गोरिदमसारखी उलगडून दाखवायला. ती अनुभवायची गोष्ट आहे.
श्रावण खलिते हाही शब्द आपल्याला बराच टोचलेला दिसतो. पण वैशाखानंतर लगेच श्रावण यावा असं मी कुठेच म्हटलेलं नाही. मी भर वैशाखात असंही म्हणू शकते की शरदाचं चांदणं पडावं असं वाटतंय. त्याने काय लगेच ते पडतं का? किंवा लगेच शरद ऋतू येतो असा त्याचा अर्थ होतो का? नाही होत.

"वाचकाला  संबंध लावता येईल असे लेखन असेल तर नव्या कल्पना, नवे शब्द, नवी रचना यशस्वी झाली अन्यथा वाचक आणि लिहिणारा यात काही संवाद नाही असे वाटते."
बरोबर आहे आपलं म्हणणं. पण ज्याला आपले सांस्कृतिक संदर्भ नीट माहीत नसतील त्या वाचकाशी आम्ही कसा काय संवाद साधू शकणार? प्रस्तुत कवितेत मी एकही नवा किंवा स्वतःचा शब्द वापरलेला नाही. मराठी शब्दकोश उघडलात तर यातले सर्व शब्द यापूर्वीच प्रचलित आहेत असे आपणास दिसेल. आता ते मला माहीत आहेत आणि तुम्हाला नाहीत ही माझी चूकही नाही आणि जबाबदारीही नाही. अमका शब्द सगळ्यांना माहीत नसेल कदाचित म्हणून तो वापरायचाच नाही असं धोरण ठेवलं तर मला लेखन बंदच करावे लागेल जे मला कधीच करावंसं वाटणार नाही.

कविता लिहिताना तर्कबुद्धी जागृत ठेवावी तशी प्रश्न विचारतानाही ठेवावी नाही का?
मला वाटतं मी आपल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. तरीही काही शंका राहिल्या असतील तर त्या आपण खुशाल मला विचारू शकता. जाहीर, व्यनि पाठवून किंवा इ-मेल लिहून सुद्धा.
--अदिती