लेख वाचल्यावर १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांपासून ते भगतसिंगापर्यंत सर्वांचे आत्मे तळमळले असतील - हाच का तो (आपल्या आठवणी कृतज्ञतेने जागृक ठेवणारा) सर्वसाक्षी? असे त्यांना वाटू शकेल... वास्तवीक लेखाची कल्पना आवडली पण बायकांबद्दल लिहाताना वापरलेले  बरेचसे शब्द अनुचीत वाटले. अर्थात सर्वसाक्षींनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने, त्यांच्याबद्दल पुढे लिहीत नाही. ज्यांना हा लेख आवडला नाही त्यांचा याच विषयावर वाद चालू आहे असे वाटते...

...पण त्या वादावारील प्रतिवाद अर्थात लेखाचे समर्थन वाचून "लेखापेक्षा समर्थन भयंकर असे वाटले". प्रश्न चष्म्याचा नाही तर मूळ लेखातील शब्दांमधून कुठल्याही "स्त्री"कडे कुठल्या पद्धतीच्या नजरेने आपण पाहातो हे जाणवते.  

या समर्थनात म्हणल्याप्रमाणेच, जर एखादा शिक्षक (विशेषतः महाविद्यालयीन) मुलींच्या (पु̮. लं. ची माफी मागत त्यांचे वाक्य जरासे बदलून:) "पाश्चात्य केशभूषा आणि तोकड्या वेषभूषा" पाहात जर बोलायला/लिहायला लागला ("माझ्या xxxx विद्यार्थीनी.." असे लेख)तर अर्थातच तो काही लैंगीक शोषण करत नसतो, पण मग ते योग्य होईल का?

त्याच पद्धतीने लहान मुलांनापण "ये रे ये रे पावसा.." शिकवायच्या ऐवजी "ढगाला लागली कळ..." शिकवायला हवे! तळ्यावर बसून (विसोबांना मासुंदा तलाव आठवेल..) मुलींकडे बघत बसणे काय किंवा मुंबईच्या लोकल्समधे "महीलांच्या बाजूच्या डब्यात उभे राहून काही न बोलता (कॉमेंट न करता), वखवखलेल्या फक्त नजरेच्या स्पर्शाने बघितले म्हणून काय, ते काही बाकीचे स्पर्श झाले नाहीत म्हणून कमी होत नाही...त्यात उभ्या असलेल्या बायकांवर जर कोणी अशा प्रकारचा लेख लिहीला तर तो योग्य ठरेल का? कदाचीत नाही, कारण दोन्ही बाबतीत (विद्यार्थीनी आणि रेल्वेतील महीला) त्या "सेवीका" नसतात. पण हवाई सुंदरी आणि हो त्यांना इंग्रजीत  आता  "एअर होस्टेस" हा शब्द  न वापरता "फ़्लाईट अटेंडंट" म्हणतात.., त्यांच्या बद्दल शब्द चालू शकतात कारण त्या आपल्या सेवेसाठीच आहेत, अशी कळत न कळत वृत्ती...

मला जे अनेक मराठी - हिंदी - इंग्रजी चित्रपट आवडतात त्यातील एक म्हणजे - मायकेल क्रीच्टन या लेखकाने लिहीलेल्या पुस्तकावर आधारीत "डिस्क्लोजर" हा आहे. "रिव्हर्स सेक्श्यूअल हरॅसमेंट" या विषयावर अर्थात "मॅडम बाईने (डेमी मूर) तिच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरूषावर (मायकेल डग्लस) केलेले लैंगीक शोषण" हा त्याचा विषय आहे.  त्यातील त्या नायकाच्या - मायकेल डग्लसच्या "स्त्री" वकीलाच्या तोंडचे एक वाक्य आहे, "sexual haraasment is not about sex, it is about power"...त्याच पद्धतीने इथे म्हणावेसे वाटते की "लेखा वरचे आक्षेप फक्त स्त्रीचे वर्णन म्हणून नाही, पण ती मांडायची शाब्दीक पद्धत आणि त्यामागील कळत नकळत विचार यावर आहे."

आपल्या समर्थनात ह्या बाबतीत विचार केलेला दिसला नाही म्हणून खटकले....