चौकसांनी ह्या लेखात पुस्तकाचा मोजक्याच परंतु नेमक्या शब्दात परिचय करून दिलेला आहेच. पण हे पुस्तक मुद्दाम वाचल्यानंतर जे जाणवले, ते इथे मी लिहीत आहे.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर केतरवहिनींचे जे छायाचित्र आहे, त्याच्याशी विलक्षण मिळतेजुळते असे त्यांचे स्निग्ध परंतु तितकेच खंबीर असे व्यक्तिमत्व ह्या आत्मनिवेदनातून आपल्यासमोर उभे राहते. जेमतेम सातवी इयत्ता शिकलेली ही स्त्री कोकणातल्या सधन खोती व्यवसाय असलेल्या घरात गेली, व अर्थातच घरकामात जुंपून गेली. लग्नानंतर काहीच वर्षांनी कूळकायद्याच्या बदलामुळे, व खास कोंकणी ग्रामिण जीवनशैलीतून सहज आलेल्या उद्दामापणामुळे, त्यांच्या नवऱ्याचा खून झाला. वृद्ध सासऱ्यांनी सर्व खोतीसंबंधीचे कब्जे धीराने चालवायला घेतले खरे, पण लवकरच त्यांचेही निधन झाले. मग वहिनी अक्षरशः निराधार झाल्या. अनेक कोर्टकचेऱ्यांच्या दाव्यात बुडालेली खोती सोडून उपजीविकेचे कोणतेही साधन हातापाशी नाही व पदरी चार मुले! बाई डगमल्या नाहीत, काही खरोखरीच्या सद्भावनेने मदत करणाऱ्या वकिल व सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी जरूर पडेल तसा कायदा आत्मसात केला, व लढा चालू ठेवला. गावातली अडाणी पण राजकारण खेळण्यात तरबेज असलेली जनता, त्यांचा त्यांच्याच तऱ्हेने दिलेला लढा हा विलक्षणीय आहे.त्या लढ्याचे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.
काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. पहिली म्हणजे ही की वहिनींचे सासूसासरे त्याकाळाच्या मानाने फारच प्रगत. आपल्या नऊ मुली शिक्षणासाठी त्यांनी दूर पाठवल्या (ही १९३०-४० ह्या दशकांतली गोष्ट आहे!), नंतर त्या सर्वच मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, ह्या सर्वात ह्या जोडप्याने समाजाच्या सर्व आक्षेपांना धैर्याने लढा दिला. एव्हढेच नाही, तर पुढे ह्यातील काही मुली त्यांचे मित्र घेऊन ह्या आडवळणाच्या गावी राजरोसपणे येत व रहात, वहिनींच्या सासूसासऱ्यांचा त्यांना सक्रिय पाठिंबा होता. पण जेव्हा वहिनींचे सौभाग्य हरपले, तेव्हा एका समदु:ख्खी महिलेने त्यांना मिडवाईफ़ीचा कोर्स करण्याचा सल्ला दिला, ज्यायोगे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या असत्या. पण त्यांच्या पुढारलेल्या सासूसासऱ्यांनी ही सूचना झूगारून टाकली! स्वतःचा तरूण व कर्तबगार मुलगा अचानक खूनाला बळी पडल्यावरही सासूबाईंची सण वैभवात साजारे करण्याची हौस जराही कमी झाली नाही. ह्या मानवी मनाच्या अनाकलीय गुंतागुंतींचा वहिनी जाता जाता निर्देश करतात. पण त्यामागे कसलीही कटूता नाही. उलत त्यांचे संवेदनाशील मन ह्यामागील कारणांचे शोध घेण्यात रमते. सासूबाईंनी स्वतःची दहा मुली व दोन मुले वाढवली, पण वहिनींच्या बाबतीत प्रेम देण्यात त्यांचा हात आखडताच होता, हे छोट्याछोट्या प्रसंगातून जाणवत रहाते. तरीही वहिनी मात्र त्या पहिल्या बाळंतपणासाठी जेव्हा माहेरी जावयास निघाल्या, तेव्हा सासूबाईंच्या पाया पडल्यावर त्यांनी किती मायेने जवळ, उराशी धरले, त्या प्रसंगाची ओलीचिंब आठवण जपतात, परतपरत त्याची उजळण करतात.
ह्या पुस्तकाच्या निमित्तने तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. बजूवहिनी 'सोवळ्या विधवा', वहिनींसारख्याच त्याही तरूण वयात विधवा झाल्या. ह्या परिस्थितित त्यांना दिवस राहिले. घरच्यांनी गर्भ पाडायचे सर्व तत्कालीन इलाज केले, पण व्यर्थ. शेवटी कळा येऊ लागल्या, तेव्हा गावातल्या सुईणीला बोलावणे पाठवले. ती आली, पण तिने अट घातली..'हे कुणाचं पाप? नाव सांगितलस तरच सुटका करीन.' कोंडीत सापडलेल्या बजूवहिनींना निरूपायानं सासऱ्यांच नाव सांगाव लागलं.
वहिनी पुढे लिहितात...' त्यानंतर अशा परिस्थितीत नेहेमी जे केलं जायचं तेच केलं. बाळाला बाजल्याच्या खुराखाली ठेवून बाळंतिणीला बाजल्यावर बसायला सांगितलं!'
उमा कुळकर्णींनी अत्यंत तोल सांभाळून वहिनींच्या आत्मनिवेदनाचे शब्दांकन केलेले आहे. हे काम सोपे नव्हे. वाईट शब्दांकन केल्याने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर नेकीने काम केलेल्या एका संस्मरणीय व्यक्तिचे चरित्र मी अलिकडेच वाचले--- म्न्हणजे वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला--, त्याची येथे आठवण आल्याशिवाय रहात नाही.