दूरदर्शन काळे-पांढरे होते तेंव्हापासून...
यिन यांग फिरण्याच्या आधी टिव्ही स्टेशनचा गोल गोळा सिग्नल आणि कूंSS असा आवाज पडद्यावर. तोही पहात बसत असू आम्ही.
रविवारी स्टारट्रेक असे सकाळी. त्यातला लांबकान्या स्पॉक भलताच आवडला होता.
"आनंद" मी पहिल्यांदा असाच एका उदास संध्याकाळी पाहिला - काळा-पांढरा - थोडा पारवाही. मनात तसाच आहे. त्यातले "कही दूर" लागले की करकरीत तिन्हीसांजा आठवतात.

छायागीतचे निर्मातेही रसिक होते - "टमटम के गीत" (मांगके साथ तुम्हारा...) , "बरसात के गीत" ("बरसातमें हम्से मिले तुम सजन...) अशा विषयांवर गाणी द्यायचे.

रेडिओवर म्हणाल तर "ईयं आकाशवाणी, संप्रति वार्ता: श्रुयंताम..." पासून "इत वार्ता:" ऐकण्यातली मजा औरच होती. बिनाका गीत मालेतला (नंतर सिबाका) अमिन सयानीचा गोड अनुनासिक स्वर कोण विसरेल? त्याचे "बेहेनो और भाईयो..." ऐकले की संपूर्ण भारत देश बंधुत्वाच्या भावनेत न्हाऊन निघायचा.
गेले ते दिवस!