प्रभातीच्या पहिल्या प्रहरी हा ('खुसखुशीत म्हणशील तर कानफाडीन' स्वगत!) कुरकुरीत, पदर सुटलेला, अरळ लेख आणि त्यावरचा साखरभातावर झणझणीत अंडाकरी ओतावी तसा पहिला प्रतिसाद वाचून कलेजा खूष झाला. त्यामुळे आम्ही कधी पुन्हा एकत्र आनंदाने विहरतो ह्या प्रश्नाचं उत्तर काळंच देऊ शकेल. हे काळं कोण या प्रश्नाने पश्च्मस्तिष्कपुच्छ (ज्याला आमचे काही मराठीद्वेष्टे मित्र 'मेड्यूला ऑबलाँगेटा' म्हणतात) उद्दीपित होऊन काही काळ समाधी अवस्था प्राप्त झाली.
माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का?मला तर हमखास अशी खुळं पछाडतात. वा! ह्योच खरा मराटी मानूस! एक जानेवारीपासून सकाळी फिरायला जाणे, रोज डायरी लिहिणे, महिन्यातून एकदा (बायकोच्या) एका नातेवाईकांच्या घरी जाणे, मुलाचा अभ्यास घेणे.. किती सांगावीत? एकदा तर माझ्या डोक्यात 'फ्रेस्का' साबणाच्या जाहिरातीचे खूळ घुसले होते. जिथे जाऊ तिथे आपली सारखी डोक्यात 'सुंदर सुहाना फ्रेस्का, खुशबूका खजाना फ्रेस्का'! शेवटी 'तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय' डोक्यात घुसवले तेंव्हा फ्रेस्कापासून सुटलो!