वास्तुशास्त्र नावाने पैसे उकळणे हा व्यवसाय हल्लीच अस्तित्वात आलेला आहे. ह्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्रज्ञ असल्याचे सांगून पैसे उकळल्याचे कधी ऐकीवात नव्हते. फेंगशुई हा दिखाव्याचा व अंधश्रद्धेचा प्रकारही हल्लीच सर्वत्र बघण्यात येतो.

काही जुन्याच व सर्वसाधारण नियमांना वळवून व नवं-नवीन नांवे देऊन हे नवे शास्त्र अस्तित्वात आणले आहे.
दाखल्यासाठी काही कारणमीमांसा - (श्री. सुनील जोशींच्या प्रतिसादाचा आधार घेत)

१. घर ज्या जमीनीवर (प्लॉट) बांधलेले आहे त्या जमीनीचा आकार चौकोनी अथवा आयताकृती असावा.
वेडावाकडा प्लॉट असेल तर घराच्या चहूबाजूंनी योग्य जागा सोडण्यास अडचण येते व बाजूच्या प्लॉटची सीमा वगैरे ह्यांवरून गोंधळ होत असावा. चौरस/आयताकृती प्लॉट असल्यास वास्तुविषारदाला (आर्किटेक्टला) अत्यंत सोप्या रितीने नकाशा काढून जागेचा अपव्यय टाळता येतो.  
२. घराच्या (शक्यतो) कमीत कमी दोन बाजूंनी रस्ता असावा.
कॉर्नर प्लॉट ! आज सर्वात जास्त डिमांड/मागणी ह्याच प्लॉटची असते. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी कॉर्नरवरचे घर नेहमीच उपयुक्त ठरते. ह्यात हवा व उजेडही व्यवस्थित मिळतो व कोपऱ्यावरच्या घराचा विजखर्च बराचसा कमी असतो.  
३. घराचे दार उत्तरेस अथवा पूर्वेस असावे. पश्चिमेस असले तरी चालेल. पण दक्षिण दिशेस नसावे. तसेच नैरूत्य कोपऱ्यात नसावे.
दक्षिणेकडे तोंड असणे हा अपशकून असल्याची भावना अनेकांमध्ये असते पण दक्षिण दिशा अशुभ असल्याचे कोणी सिद्ध केलेले नाही. प्रत्येक दिशेवर एखाद्या देवतेचे प्रभुत्व असते असे मानतात. दक्षिणेवर यमाचे प्रभुत्व असल्याने व यमाविषयीच्या अंधश्रद्धांमुळे ही दिशा अशुभ मानण्याची वेडगळ प्रथा पडली असावी. (यमाने आपले काम केले नाही तर काय होईल ह्याचा विचार ही दिशा अशुभ मानणाऱ्यांनी करावा !) गुरुत्वाकर्षणाच्या प्रक्रियेमुळे दक्षिणेकडे पाय करून झोपू नये कारण ध्रुव तारा ज्या दिशेला असतो त्या दिशेला देहातले अणुरेणू व पोटातले अन्नपदार्थही सूक्ष्मता खेचले जातात व अन्नपचनास अडथळा येतो. तसेच झोपेतही कार्यरत असलेल्या आपल्या मेंदूच्या पेशींची उलट दिशेने प्रक्रिया सुरू झाल्यास मेंदू शिणवतो व झोपेचे समाधान मिळत नाही/वरचेवर जाग येते. बाकी दक्षिणेबद्दल शुभ अशुभ मानणे म्हणजे निव्वळ थोतांड आहे.

४. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे.
सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ ही एकच असते तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. (उगीच नाही गोऱ्या कातडीची माकडे सनबाथ घ्यायला खास सुट्टी टाकतात !) 

५. जर घराला स्वतःची गच्ची असेल तर ती उत्तर / नैरूत्य कोपऱ्यात असावी.
ह्याचे नेमके कारण सांगणे जरा कठीण आहे. साऊथ वेस्ट चा वारा मुंबईत ८/९ महिने अव्याहत असतो त्यामुळे माझ्या घराला गच्ची ठेवायची झाल्यास मी साऊथ वेस्टला ठेवीन.  

घराच्या आतील काही गोष्टी

१. देवघर ईशान्य दिशेस असावे.- इतर दिशांना नसण्याची कारणे सांगणे कठीण असावे !
२. घराचे दार आतल्या बाजूस उघडणारे असावे. तसेच ते पूर्णपणे उघडणारे असावे.- जड वस्तू/कपाटे वगैरे सहजा सहजी आत/बाहेर ने आण करण्यासाठी... 
३. घरातील दारे हालवताना आवाज येऊ नये.- आवाज/ध्वनी प्रदूषण टळावे म्हणून !

बाकी खालील विचारांशी सहमत.  

लक्षात घेण्याच्या काही व्यावहारिक बाजूः
१. घर हे शहराच्या मध्यवर्ती असावे. जर किमतीत परवडत नसेल तर किमान मध्यवर्ती भागाला जवळ असेल व वाहतुकीची चांगली सोय असावी.
२. किमान पुढील १०-१५ वर्षे, त्याकाळात आजूबाजूची होणारी संभाव्य वाढ, आपल्याला लागणाऱ्या गरजा यांचा विचार करावा.
३. मुलांच्या शाळा, कॉलेज, आपले ऑफिस, येण्याजाण्याला लागणारा वेळ, त्यासाठीचा खर्च (पेट्रोल इ.) यांचा विचार करावा.
४. जर घरी थांबणार कोणी असेल (नसेल तरीही) उदा. बायको, वयस्क व्यक्ती यांची सुरक्षितता, शेजार, अचानक उपयोगी येतील अशी माणसे, दवाखाने हे सहज उपलब्ध होतील हे पाहावे.

ह्या व्यतिरिक्त काही गोष्टी: आजूबाजूला पुढे उपद्रवी ठरतील अशी झाडे (वड, पिंपळ, औदुंबर, कडुनिंब, बाभूळ वगैरे मुळे फोफावणारी झाडे/ नाजूक खोडाची- चाफा, शेवगा इ.) लावू नयेत.
प्लॉट सखल भागापेक्षा थोडा उंच करून घ्यावा जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल व बाहेरील पाणी आत येणार नाही.

जाता जाता - "शास्त्र" ह्या शब्दावर आक्षेप असू नये कारण कोणत्याही वस्तूची निर्मिती ही शास्त्रोक्त पद्धतीनेच झालेली असते - ह्या बाबत आमच्या कॉलेजचे ब्रीदवाक्य आठवले, WE ENGINEERS MOVE THIS WORLD ! ह्या वाक्यातच सर्व काही आले- सकाळी उठल्यापासून रात्री निजे पर्यंत इंजिनीयरींगने किंवा शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली वस्तू न वापरण्याचा प्रयत्न करा.... एक दिवसही जगणे कठीण जाईल ! फक्त शास्त्र नावाखाली थोतांड विकण्याच्या प्रथेला नक्की विरोध करावा !