दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात. (येथे 'भाषा'चा अर्थ बोलीभाषा असा अभिप्रेत आहे.) संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रमाणित भाषा असावी हे सोयीचे आहे. शेवटी भाषेचा उपयोग विचार व्यक्त करणे आणि समजून घेणे ह्यासाठीच करायचा असतो. त्यासाठी एक प्रमाणित माध्यम असावे हे समजण्यासारखे आहे. परंतू हे प्रमाणित माध्यम असे असावे की जे सर्व मराठी भाषिकांना आपलेसे वाटेल.
शुद्ध भाषेचा आग्रह धरताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मराठीमध्ये निर्माण झालेल्या श्रेष्ठ साहित्यामध्ये अनेक ठिकाणी बोलीभाषेचा वापर झाला आहे आणि किंबहुना त्यामुळेच ते साहित्य मनास भिडते. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीने भाषा समृद्ध होतात. काळानुसार नवनवे अनुभव आणि विचार व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये नवीन शब्दांची भर पडत राहते. आणि त्यामुळेच भाषा जिवंत राहते. मराठीला जर आजच्या शुद्धाशुद्धतेच्या नियमात बांधून ठेवले तर ही भाषा पुढे जाऊन मृतवत होण्याचा धोका आहे.
"मराठीची पीछेहाट होते आहे" असे बरेच मराठीप्रेमी म्हणतात. इथे वापरलेल्या 'पीछेहाट' ह्या शब्दातच हिंदी/उर्दू/फारसी चा मराठीवर झालेला संस्कार बघायला मिळतो. जर गेल्या अनेक शतकांमध्ये वेगवेगळ्या भाषांचे संस्कार मराठीवर होऊनसुद्धा मराठी जगली वाढली आहे तर आज अचानक मराठी संपून जाण्यासारखे काय झाले?
शुद्धाशुद्धतेचा विचार करायचा झाल्यास संस्कृतमधून निर्माण झालेल्या मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषांतील शब्द हे संस्कृतच्या जास्त जवळ आहेत, परंतू ते शब्द प्रमाणित भाषेत नाहीत म्हणून अशुद्ध समजले जातात. महाराष्ट्रातील एका विशिष्ठ जागी बोलली आणि लिहिली जाणारी मराठी श्रेष्ठ/शुद्ध आणि मराठीची इतर रुपे अशुद्ध असे जर असेल मात्र खरेच 'शुद्ध' मराठी लवकरच संपेल असे वाटते. एका शब्दाला समानार्थी असे अनेक शब्द कोणत्याही भाषेत असतात. त्यापैकी काही शब्दांना विशिष्ठ छटा असतात. अशा समानार्थी शब्दांच्या यादीत जर बोलीभाषेतील शब्द समाविष्ट करून घेतले (अधिकृत पणे) तर मला वाटतं मराठी आणखी व्यापक होईल. प्रवाहित होईल, श्रीमंत होईल. ह्यावर विचार व्हावा.
दुसरे म्हणजे इंग्रजी किंवा हिंदीचे आक्रमण हा नेहमी चर्चिला जाणारा विषय. शेकडो वर्षे गुलामगिरीत राहूनसुद्धा मराठी जिवंत आहे. तिची रुपे बदलत गेली पण भाषा मृत झाली नाही. उलट परकीय भाषेतून काही शब्द उचलून मराठीने ते आपलेसे करून घेतले. त्याच न्यायाने आज हिंदी किंवा इंग्रजीचे आक्रमण होतेय असे म्हणणे चूक आहे. काळ बदलेल तशी भाषा बदलणार हे सत्य आहे. तसे बघू जाता आजची इंग्रजी आणि शंभर किंवा दोनशे वर्षांपूर्वीची इंग्रजी ह्या तरी सारख्या आहेत काय? अनेक परकीय शब्द आत्मसात करून इंग्रजी वाढली आहे.
तुम्ही जर पिझ्झा खाणार तर त्याला पिझ्झाच म्हणायला हवे. उद्या त्यासाठी कोणी संस्कृतोद्भव मराठी शब्द 'शोधून' काढला तर तो वेडेपणा ठरेल. हां, पुरणपोळीला मात्र पुरणपोळीच म्हणा. पुरणपोळीला sweet stuffed pancake वगैरे नावे (मराठी बोलताना) वापरणे हे आक्रमण होईल. त्याच न्यायाने transformer ला रोहित्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असे मला वाटते. ज्या गोष्टी पूर्वी अस्तित्वात नव्हत्या त्यांच्यासाठी उगाच मराठी शब्द (त्यातही संस्कृत शब्द) शोधून ते वापरण्याचा आग्रह करणे, हा मराठी टिकवण्याचा उपाय नाही.
मनोगतावर महाराष्ट्रातील सर्व भागांतून लोक येत असतील असे मला वाटते. त्यांनी अधून मधून आपापल्या बोलीभाषेत लिहिले तर मनोगत श्रीमंत होईल. हवे तर काही शब्दांचे प्रमाणित भाषेतील समानार्थी शब्द तळटीप म्हणून द्यावेत. प्रशासकांना विनंती आहे की त्यांनी ह्या सूचनेला जाहीर पाठिंबा द्यावा.
राजेन्द्र