तुमचे सर्वच लिखाण वाचून आनंद होतो. मनोगतावर तुमच्यासारख्यांचे आगमन ही एक पर्वणीच ठरत आहे.
चपळगावकरांच्या पुस्तकाबद्दल वाचून अनेक विचार मनात आले. त्यांपैकी काही.
सर्वप्रथम म्हणजे त्या पुस्तकाचा अनुभव "मनोगती"पर्यंत पोचविण्यात तुम्ही कमालीचे यशस्वी ठरला आहात यात काही शंकाच नाही. रसास्वाद करावा तर तो असा - सांगोपांग , चित्रदर्शी.
चपळगावकरांच्या पुस्तकाबद्दल वाचताना मन अगदी सहज भूतकाळात गेले. बालगंधर्व, नाना पाटील वगैरेंचे किस्से वाचून आमच्यासारख्या , त्या काळाच्या नंतर जन्माला आलेल्याना आपल्या आधीच्या काळाशी नाळ जोडल्यागत झाले. एकूणच , एका साध्यासुध्या माणसाच्या साध्यासुध्या आयुष्याबद्दल वाचताना , काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या अनेक गोष्टींचे स्मरण रंजन घडले..
पण काही प्रश्न - जे अशा प्रकृतीच्या लिखाणाच्या वाचनानंतर नेहेमी पडतातच- ते पडलेच.
जी एंनी कुठेतरी म्हण्टल्याप्रमाणे - चपळगांवकरांना एकूण दिसले बरेच ; पण त्यांनी काय "पाहिले" ? काळाच्या एका तुकड्याचे, एका "फ्लाय ऑन द वॉल" च्या दृष्टीकोनातून का होईना, पण , प्रामाणिक चित्रण त्यांनी केले खरे , पण अशा छोट्या आयुष्याचा छोटा का होईना पण अर्थ त्याना काही दिसला काय ? एकूण गोळाबेरीज मांडण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला का ? का तो त्यांचा उद्देश नव्हताच ?
आणि तसे असेल तर मग अशा लिखाणाचे मूल्य काय रहाते ? चपळगांवकरांनी आपल्या खिशातून बहुदा हे पुस्तक काढले आणि एकूण पहाता ते बाबा कदम टाईप धंदेवाईक नाहीच. मग या सर्व खटाटोपाचा अर्थ काय रहातो ?