शरद रामचंद्र गोखले,

आपल्या शुद्ध मराठीबद्दलच्या कल्पना साफ चुकीच्या आहेत. भाषा काळाप्रमाणे वळण घेते. १४ ते १८ व्या शतकात मराठीत फारसी, तुर्की आणि अरबी भाषेतून अनेक शब्द आले. शुद्धीकरणाच्या नावाखाली हे सर्व शब्द मराठीतून काढून टाकायचे का?

उदाहरणादाखल महाराष्ट्राच्या आवडत्या पु. ल. देशपांड्यांच्या 'एक शून्य मी' मध्ये आढळलेले खालील शब्द पाहा:

खुर्ची, रयत, बेदरकार, बेजबाबदार, बेफिकीर, फरमान, कायदा, दप्तर, चिल्लर, खुर्दा, मुकाबला, सैतान, बेहोशी, खानदानी, फौजी

असे शेकडो इतर भाषांतून आलेले शब्द सापडतील.

दुसरा मुद्दा (बघा परत) असा की जगातील सर्वच भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण होते त्यात काय विशेष? इंग्लिशमध्ये कितीतरी भाषांतून शब्द आले आहेत. इथे मी इंग्रजी म्हणायचे मुद्दाम टाळले आहे,"इंग्लिश" हे विशेषनाम आहे, त्याचे मराठीकरण करायची गरज नाही. जर तुम्हाला 'पुणे' ऐवजी पूना म्हटलेले आवडत नसेल तर इंग्लिशला उगाच 'इंग्रजी' का?

जर राज्यकर्त्यांची आणि प्रजेची भाषा वेगळी असेल तर प्रजेच्या भाषेत राज्यकर्त्यांच्या  भाषेतील शब्दांची भर पडतेच.  एवढेच नव्हे तर राज्यकर्त्यांची भाषाही प्रजेच्या भाषेतून काही शब्द उसने घेते. ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोश बघा, माझे म्हणणे तुम्हाला लगेच पटेल.

पारिभाषिक शब्दांना मराठी पर्याय शोधणे मुळीच वाईट नाही, पण लॅपटॉपला 'मांडीवर' जोपर्यंत रूढ होत नाही तोवर मी जर मी "मी माझा मांडीवर मांडीवर घेऊन अंगणात झाडाखाली बसलो होतो" ह्या वाक्याचा अर्थ कोणालाच कळायचा नाही. :-)

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच...

-अमिबा