शेती ही अशी एकमेव इंडस्ट्री आहे, जिच्यात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तिच्या मालकाचे पूर्ण नियंत्रण नसते- या विधानात मला हेच म्हणायचे होते की पाऊस आणि हवामानातील बदल शेतकऱ्याच्या हातातल्या गोष्टी नाहीत. दुसरे असे की वातावरणातले सगळेच घटक इतक्या गुंतागुंतीच्या पद्धतीने एकमेकांशी निगडित असतात की एक संकट अनेक संकटांना जन्म देते.
उदाहरणार्थ - अवेळी पावसाने फक्त पिकांचा फुलोराच गळून पडतो असे नाही, तर काही काळाने रोगराईही पडते, त्यानंतर काही काळाने कदाचित तणाचीही समस्या उद्भवू शकते. इतकेच नव्हे, तर या संकटांची घनता-तीव्रताही सारखी नसते. म्हणजे तीन दिवस अवेळी पाऊस झाल्याने इतकी कीड पडेल, त्यावर इतकेच किटकनाशक लागेल असे काही निश्चित कोष्टक असू शकत नाही. याचा आर्थिक ताण येतो. एका वर्षी तीन दिवसांच्या पावसाची कीड कीटकनाशकांच्या दोन फवाऱ्यात (राऊंड्स) आटोक्यात येऊ शकते, पुढच्या वर्षी तेवढ्याच पावसानंतर, त्याच पिकाबाबत असे लक्षात येते की कितीतरी जास्त फवारे लागणार आहेत (तेही दोनदा फवारून झाल्यावर कीड आटोक्यात येत नाही हे पाहिल्यावर) तेव्हा मग तातडीने धावपळ करावी लागते, पैसा गाठीशी नसेल तर उधार उसनवार करावी लागते. त्यात तालुक्याच्या ठिकाणी दिवसदिवस जातो. एवढे करूनही जर किटकनाशक मिळाले नाही तर पिक किडीच्या भक्ष्यस्थानी पडताना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते. उशीरा मिळाले तर जास्त नुकसान सोसावे लागते.
तरीही हे कृपया लक्षात घ्या, की हे अतिशय सोपे करून घेतलेले उदाहरण आहे.
कारखान्यात तसे नसते, एखादा बेल्ट तुटला हे कळले तर त्यामुळे यंत्राचा कोणकोणता भाग थांबेल, त्यामुळे प्रोसेस किती लांबेल याची निश्चित कल्पना मिळत असते. तशी दुरुस्ती, इन्व्हेंटरीची सोय केली की बेल्ट तुटल्यानंतर सारे सुरळीत व्हायला किती वेळ लागेल हे सहज सांगता येते. गुंतागुंत कमी असते. एका युनिटचा बेल्ट तुटला, तरी दुसऱ्या युनिटवर त्याचा काहीएक परिणाम होणार नाही, हे पक्के असते. उत्पादनातली घट भरून काढावी लागण्यासाठी किती कामगारांना सुटीच्या दिवशी बोलवावे लागेल, त्याचा खर्च किती होईल ही सारी कोष्टके कारखान्यांकडे असतात किंवा आजकाल सहज तयार करता येतात.