एखाद्या संकल्पनेसाठी जर मूळ भाषेत शब्दच अस्तित्वात नसेल, अथवा जरी असला, तर तो क्लिष्ट (मराठीच्या संदर्भात, उगाच संस्कृताळलेला) असेल, तर परकिय भाषेतून शब्द घेण्यास हरकत नसावी. आपण दाखवलेले अनेक फारसी शब्द मराठीत असे आलेले आहेत, तसेच मला वाटते, तेलुगूतूनही आपल्या भाषेत बरेच शब्द आलेले आहेत, व त्यांचा आपण सहज स्वीकार केलेला आहे. ह्याचप्रमाणे इंग्रजीतूनही आपण कैक शब्द घेतलेले आहेत व ते आता अगदी सर्वमान्य झाले आहेत. पण ह्या सगळ्या शब्दांना अंगिकारण्यामागे सहजता, व मूळ मराठी भाषेत त्या संकल्पनेला शब्दच नाही, ही कारणे होती. उदा. स्टेशन, प्लॅटफॉर्म हे शब्द. पण जेव्हा काही संकल्पनांना (entities) सहज असे मराठी शब्द अस्तित्वात आहेत, व ते प्रचलितही आहेत, तेव्हा त्यांचासाठी विनाकारण दुसऱ्या भाषेतून शब्द घेण्याचे कारण काय? व ते घेतलेले शब्दही असे, की ते मराठीत वेगळ्याच अर्थाने प्रचलित आहेत. काही उदाहरणे:

'संपन्न': नदीमुळे गावाचे जीवन संपन्न झाले, लताबाईंच्या गायनाने आमचे जीवान संपन्न झाले--- हे मूळ अर्थ. पण आजकाल गल्लीबोळातला कुठलाही कार्ञक्रम 'संपन्न' होतो!

'सतर्क': पोलीस सतर्क राहिले आहेत, जनतेने सतर्क राहावे! पूर्वी सरळ 'जनतेने सावधान राहावे' असे म्हटले जात असे, आणि ते पुरेसे अर्थप्रवाही होते.

'शासन': सरकारचे शासन कधी व का झाले?

'प्रभावित' : कोर्टाच्या आवारात झालेल्या खूनाने तेथील लोक 'प्रभावित' झाले, हे मी एका मराठी दैनिकात प्रत्यक्ष वाचले आहे. त्यांना असे म्हणायचे होते की, 'त्या खूनामुळे तेथील लोक घाबरले'. डॉ. आंबेडकरांच्या कार्याने जनता प्रभावित व्हायची, पूर्वी!

'हल्लाबोल' : हा शब्द कोठून आला? 'क्षयळ'च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या 'दंगलीमुळे' किंवा 'गोंधळामुळे' असे म्हटले तर पूर्वी आम्हाला कळत होते!

नवनवे शब्द भाषेत सहजगत्या आले पाहिजेत व ते आपाण स्वीकारले पाहिजेत, हे खरे, पण त्याला काही साधे निकष आपण लावणार की नाही? नवे शब्द स्वीकारतांना त्यांचा माराठीत प्रचलित अर्थ काय आहे तो बघा, तसेच त्या शब्दासाठी सहज, प्रचलित मराठी शब्द आहे की नाही, हेही बघा!