इतक्या कमी पैशात मिळणाऱ्या उत्पादनावर मराठीच्या रक्षण- संवर्धनाची जबाबदारी आपण का टाकतो? त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात ती पेलवेल का, याचा साधा विचार तरी कुणी केलाय का ? कोणत्या वर्तमानपत्राने ही जबाबदारी जाहीररित्या उचलली आहे का?

मी बरीचशी मराठी वृतपत्रे त्यांच्या संकेतस्थलांवरून वाचतो, त्यावरून सांगतो-- विनाकारण हिंदाळलेले व आंग्लाळलेले 'मराठी' फक्त मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या 'त्या' दोन वर्तमानपत्रातूनच वाचावयास मिळते. इ-सकाळ सर्वच बाबतीत मला फार जबाबदारीने वागते, (व त्यात संपादकीय व्यक्तिमत्व व मराठी भाषेची रास्त्पणे राखलेली बूज हे दोन्ही आले) असे वाटते, तसेच पुढारीही मराठी बऱ्यापैकी नीट लिहितो. लोकमताची गोष्ट थोडी वेगळी आहे, कारण मध्य प्रदेशाच्या सानिध्यामुळे तिथे हिंदीचा थोडासा प्रभाव आढळतो-- जसे 'गाडी पटरीवरून घसरली' अशी वाक्यरचना. पण तरीही ते लिहित असलेली मराठी इतकी वाईट नाही.

आपण ह्या सर्व वृतपत्रांवर मराठीच्या रक्षण- संवर्धनाची सर्व जबाबदारी टाकत नाही. पण, व्यवसायाला सामाजिक जबाबदारी आपोआप असतेच (C.S.R.)  त्यातून त्यांची सुटका नाही.

.......मराठी ही ऱ्हास होत जाणारी भाषा आहे, याची आपल्याला माहिती आहे का? .....मला माफ करा, पण वर्तमानपत्रे आणि शाळा महाविद्यालयांना याबाबत दोष देणे खूपच सोपे आहे. लक्षात हे घेतले पाहिजे की भाषा ही नेहमी जेत्यांची -नेत्यांची, नवकोट नारायणांची, खऱ्या अर्थाने समर्थ- सार्वभौम व्यक्तिंचीच वापरली जाते, वाढते, टिकते. मराठीही वाढू शकेल, टिकू शकेल, सर्वदूर वापरली जाईल, इतर भाषक वर्तमानपत्रेही मराठी शीर्षके देऊ लागतील. हे सगळे घडू शकेल ते वार्ताहर-मास्तरांमुळे नव्हे, तर समर्थ -समृद्ध -सार्वभौम स्त्रीपुरुषांच्या वाढत्या संख्येतूनच. आणि हे कसे घडवता येईल, यावर खरेतर चर्चा व्हायला हवी.

इथे मात्र मी आपल्याशी काही अंशी सहमत आहे. मी हे पूर्वीही लिहिले आहे की माझ्या बघण्यात जे येते ते हे की मराठी माणसे (विशेषतः मुंबईपुण्याची), जेव्हा अगदी दूर परक्या ठिकाणीसुद्धा एकमेकांना भेटतात, तेव्हा ती हिंदी अथवा इंग्रजीतून बोलू लागतात. आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल, व संस्कृतिबद्दल इतकी लाजेची भावना मलातरी दुसऱ्या कुठल्याच भारतीय प्रांतीयवासियांच्यात आढळून आली नाही. दोन गुजराती, दोन मारवाडी, दोन बंगाली, दोन तामिळ, दोन तेलुगु, दोन मल्याळी.... भेटले, की आपसूकच त्यांचे संभाषण त्यांच्या मातृभाषेत चालू होते. बरे इंग्रजी माध्यमातून शिकण्यामुळे असे झाले, असे जर म्हटले, तर तामिळ मंडळींचे काय? ह्यावरून माझे तरी मत असे झाले आहे की आम्हाला आपल्या भाषेविषयी, आपल्या संकृतिविषयी अजिबात अभिमान नाही. तेव्हा वाचकांनाच जर दूसरी भाषा वाचण्यात आनंद व अभिमान आहे, --तर वृतपत्रांनी तरी कोठवर किल्ला लढवावा?