आपण हे सर्व सविस्तर सांगता आहात, ते दैनंदिन व्यवहाराच्या (operations)  विषयीचे आहे. परंतु माझा प्रश्न व्यवसायाच्या नियोजनासंबधीचा होता. कुठल्याही व्यवसायाला, मग तो शेतीचा असो, वाण्याचे दुकान असो, जागतिक स्तरावर कार्यरत असणारी विमान कंपनी असो, अथवा मॅकडोनाल्ड असो, नियोजनाची नितांत आवश्यकता असते, व म्हणूनच व्यवसायशास्त्राच्या शिक्षणाच्या प्रारंभीच पेस्टलचे महत्त्व सोदारहण पटवून दिले जाते. आज सुखेनेव चालणारी घरगूती वाण्याची दुकाने mom-and-pop stores) आता येऊ घातलेल्या सुपरमार्केटच्या पुढे कशी टिकाव धरणार? त्यासाठी त्यांना काय काय करावे लागणार आहे? दशकांनूदशके सुखेनैव चालणाऱ्या मॅकडोनाल्डला नव्वदीत अचानक आरोग्यदायक खाद्य (healthy food) ह्या एक्दम उपटलेल्या समस्येचा सामना करावा लागलाच की. त्यांच्या त्यांच्या देशांच्या सरकारांनी सहाय्य केलेल्या अनेक मोठ्या विमान कंपन्यांनाही गेल्या दशकामध्ये अचानक स्वस्त-व-जेव्हढ्यास-तेव्हढे (no-frills)  विमान कंपन्यांशी लढा द्यावा लागलाच. माझा प्रश्न शेतीच्या संदर्भात असे काही केले गेले की नाही, हा आहे. जर वर्षांनूवर्षे शेतकरी त्याच जुनाट तंत्राने शेती करत राहिले, तर अर्थातच वर्षांनूवर्षे चालू असलेल्या नैसर्गिक प्रतिकूलतेशी सामना करण्यात ते कमी पडणारच! आपण एका प्रॉडक्शन कं. चे उदाहरण दिलेत. ही कंपनी जर बदलत्या तंत्रद्यानाचा काहीही फायदा गेऊ शकली नाही, व त्याच जुनाट तंत्राने, व जुनाट सामग्रीने जर ते उत्पादन करत राहिले, तर अर्थातच काही कालाने, त्यांची उत्पादनक्षमता खालावेल, तसेच नव्याने चालू झालेल्या एखाद्या कारखान्याशी ते स्पर्धा करून शकणार नाहीत. म्हणजे एखाद्या उत्पादकालाही आपल्या आजूबाजूची परिस्थिती (राजकिय, सामाजिक, एकॉनॉमिक, तंत्रज्ञानाच्या संदर्भात, व कायद्याच्या संदर्भात) सतत न्याहाळत राहावी लागते, व त्याप्रमाणे आपले नियोजन करत व बदलत रहावे लागते.

पाऊसपाण्याची लहर ही काही आजच उद्भवलेली बाब नव्हे. ती तर आपली जुनी रड आहे. पण त्यावर मात करण्यासाठी आपण काय केले? आणि, इतर देशांतल्या शेतीच्या संदर्भात ही रडारड आपल्याला का ऐकू येत नाही?