वर्तमान पत्र हे एक जन संपर्काचे माध्यम आहे जे मोठ्या संख्येने वाचले जाते. त्यामुळे त्यातील भाषेची शुद्धता  पाळली जावी आणि अन्य भाषेतील शब्दांचा अनावश्यक वापर टाळावा असा आग्रह धरणे योग्य आणि आवश्यकही आहे. पण अशीच कळकळ अन्य संपर्क माध्यमाबाबतही असावयास हवी. त्यावरही अशीच चर्चा व्हावी. उदाहरणार्थ झी मराठी या वाहिनी वरील सा रे ग म प या कार्यक्रमाच्या निवेदिकेचे मराठी! या बाईंच्या दहा शब्दांच्या वाक्यात किमान चार शब्द तरी इंग्लिश असतात. अद्याप 'परफॉर्म' करणे साठी 'सादर करणे' हा शब्द त्यांना स्व:ताला सापडलेला नाही आणि कोणी तसे त्यांच्या निर्दशनास आणून दिलेले नाही. या बाईंचे इंग्लिश बोलीभाषेवरील प्रभुत्व बऱ्यापैकी असावे असे दिसते. त्यामुळे मराठीत सादर करण्याचे वाक्य त्या मनातल्या मनात आधी इंग्लिशमध्ये तयार करीत असाव्यात आणि मग तेच वाक्य मराठीतून सादर करतांना त्यांची जी त्रेधा तिरीपिट उडते ती प्रत्यक्षात दिसते. इमोशन, मोराल, मोराल बूस्ट करणे, स्केल, लाऊड, बेसिकली, प्लॅटफॉर्म, चॅलेन्ज अशा सारखे अनेक शब्द त्या लीलया उच्चारतात. आता याला
प्रवाही भाषा किंवा भाषेचा प्रवाह म्हणायचे कां?