गोखले साहेब,

म. टा. काय किंवा इतर अनेक वर्तमानपत्रे 'वाचकसंख्या' वाढवणे या एकाच हेतूने प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने तरुण वर्ग हे त्यांचे लक्ष्य आहे. पत्रकारितेमध्ये दोन तपे घालविलेल्या व आज एका प्रकाशनात सन्माननीय पद भूषविणाऱ्या एका सुपरिचित व्यक्तीने, जी एकेकाळी मटा मध्ये होती; तिने हे निवेदीत केले आहे. अर्थात सर्वात कमी कष्टाचा मार्ग म्हणजे इंग्रजी मिश्रीत मराठी बोलणाऱ्या पिढीला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या भाषेत लिहिणे!

आपली भाषा संपन्न असताना विनाकारण परके वाक्प्रचार वा शब्द का घुसडा? केक ला गोड ढोकळा म्हणणे हा अतिरेकी अट्टहास ठरेल, पण अरे वा! ऐवजी उगाच वॉव! करायची गरज काय? मी या पूर्वीही असे आग्रही प्रतिपादन केले आहे की आपण मराठीतून बोललो तर आपले वर्तुळ, महत्त्व व वाटचाल मर्यादित राहील; आपल्याला बाह्य जगात किंमत मिळणार नाही, आपण मागास भासू या भयगंडाने तसेच आपण उच्चभ्रू समाजाचे प्रतिनिधित्व करायचे तर मराठी बोलणे परवडणार नाही या समजाने पछाडलेले अनेक मराठी लोक आवर्जून हिंदी वा इंग्रजीने बरबटलेले मराठी बोलतात. परिणामत: कलाकार असे मराठी बोलून बहुधा अधिक समृद्धीच्या हिंदी रजतसृष्टीचे दरवाजे ठोठावत असावेत. अर्थात अनेक मराठी कलावंत जे अनेक वर्षे हिंदीतही आहेत ते त्यामानाने उत्तम मराठी बोलतात. ते कशाला? परदेशात अनेक वर्षे स्थायिक असलेले मराठी लोक व्यवस्थित मराठी बोलतात.

वर्तमानपत्राचे मूल्य किती हा प्रश्न निरर्थक आहे. त्याला एक चेहरा आहे, ओळख आहे, एक प्रतिष्ठा आहे ती वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे साधन असल्यामुळे आहे. म्हणूनच वर्तमानपत्रे, नाट्य-चित्र-मालिका कलावंत यांनी आपल्या भाषेचे भान व मान राखले पाहिजेत. भाषा प्रवाही असली तरी सहज बोलायची भाषा आणि लेखी अधिकृत भाषा यात अंतर हे हवेच अन्यथा मूळ अस्तित्व हरवेल. जे आपल्या कडे नाही व अन्यत्र उत्तम आहे ते स्वीकारावे, पण जे आपल्या कडे उत्तम आहे ते दुसरीकडून गोळा करायचे कारण काय? तडका हा शब्द प्रयोग पदार्थ सूचीमध्ये वाचताना खटकत नाही कारण दाल-तडका हा काही मराठी पदार्थ नाही. पण खमंग फोडणीच्या पोळीला तडका-चपाती म्हटले तर कस वाटते? ते कानाला खटकणारच. चिनी भाषेत तर टॅक्सी ला देखील छू चू असे सहजपणे म्हणतात, परकी कल्पना असूनही. मोबाईल ला स्सोऽची सहजपणे म्हणतात. सँडविच ला देखिल सांतु ऽज्ज असे म्हणतात.

तात्पर्य अनाठायी इतर भाषेतले शब्द / वाक्प्रचार वापरणे समर्थनीय वा उचित नाही. काही शब्द/ वाक्प्रचार सहजपणे तोंडी व्यवहारात येत असले तरी त्यांना लेखी स्थान देता कामा नये. आता पत्र ही संस्कृतीच नष्ट होत आहे पण लहानपणी पत्रव्यवहार करताना पत्रातली लेखी मराठी वेगळीच असल्याचे जाणवायचे. उदाहरणार्थ बोलताना आपण 'आम्ही चार वाजता घरी पोचलो' असे म्हणत असलो तरी पत्रात 'गाडी वेळेवर पोहोचली' असे लिहिले जात असे. बोलताना 'आमच्याकडे जेवायला या' असे म्हटले तरी पत्रात 'भोजनास अगत्य येण्याचे करावे' असे लिहिले जात असे. आज जरी ते थोडे विचित्र वाटले तरी भाषेचा तो आब वेगळाच असे.