चर्चेतले माझे मत मी (अगदी थोडक्यात का होईना ) व्यक्त केलेच आहे.
माझे असे म्हणणे आहे की या सर्व चर्चांना काहीतरी 'उपाय' किंवा 'समाधान' शोधण्याकडे अजून लक्ष देणे गरजेचे आहे. माझ्या परीने मी प्रश्न आणि उत्तर नीट मांडण्याचा प्रयत्न करतोय.
प्रश्न : मराठी वर्तमानपत्रांनी धेडहिंग्लिश भाषा वापरायला सुरुवात केली आहे. ज्यात मराठीत रूढ असलेल्या शब्दांनाही इतर भाषांतले शब्द वापरणे चालू आहे. जी आपणास आवडत नाही आणि मराठीच्या भवितव्यासाठीपण हे चांगले नाही. तर काय करावे?
विचार आणि उत्तर:
असे का झाले? भाषेचे अर्थकारण झालेय. लोकांना जे आवडते ते लोक घेतात आणि विकणारे तेच विकतात. हा साधा मागणी - पुरवठ्याचा नियम आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती वस्तू विकत घेण्याचे बंद करा. वाटल्यास गोखल्यांसारखे म.टा. ला पत्र टाकून बंद करा. आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या की बरोबरच बदल होतात.
टीप: (जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या एकट्याच्या करण्याने काय होणार आहे? तर तुम्ही असेही अल्पसंख्य असल्याने तुमच्या मताला अर्थकारणात किंमत नाही.)
नाण्याची दुसरी बाजू - (आजची तरूण पिढी वर्तमानपत्र वाचते असे खात्रीलायकपणे म्हणण्याइतका मला तरी विश्वास नाही. आणि त्यांचे मराठी वाचन पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे असते की नाही तेही विवादास्पद. त्यामुळे म.टा. च्या या भाषेमुळे का होईना जर ही मुले वर्तमानपत्र वाचायला लागली तर मधले मधले मराठी शब्द तरी वाचतील.)