2) मनोजय इथे वर्तमानपत्राच्या धंद्याच्या गणिताविषयी बोलत होते. पण असे करतांना त्यांना व्यवसायाची सामाजिक बांधिलकी असते, (corporate social responsibility) ह्याचा विसर पडलेला दिसतो.
corporate social responsibilityमध्ये जुन्या वळणाच्याच (शुद्ध) भाषेचा अभिमान आणि राखणावळ कुठे, कशी येते बुवा? जगभरातल्या सीएसआर पद्धतींविषयी वाचतोय, पण मला तरी आजवर कुठे आढळली नाही. कुणाला आढळल्यास या चर्चेत लिंकीत करून उपकृत करावे ही विनंती.
एखाद्या मराठी वर्तमानपत्राने स्वत:च्या सामाजिक जाणिवांच्या संदर्भात भाषेच्या किमान शुद्धिची बूज राखावी की नाही, ह्याबाबत लिंक मागावी लागते, ह्यात जर उपरोधिक विनोद असेल तर तो भाग वेगळा, ह्यापलिकडे काय म्हणणार? नाहीतर स्व:च्या पत्रात अत्यंत हिंदाळलेली भाषा वापरत रहावी, व कडेकडेने त्या पत्राने 'मराठी भाषा व मराठी संस्कृतिचे भवितव्य' अशा थाटाचे परिसंवाद आयोजावेत, व असे केल्याबद्दल स्वतःचीच पाठ जाहीरपणे थोपटून घ्यावी. अर्थकारणाचा भाग मी मान्य करतो (खाली वाचा) पण शेवटी ज्याने त्याने स्वतःच आपण किती खाली जाऊ शकतो, ह्याची रेषा (बॉटम लाइन) ठरवणे बरे, नाही का?
***************
एक मराठी वाचकवर्ग ज्याला अशी ही ("भ्रष्ट मराठी") भाषा वाचायला, व बोलायला आवडते, त्यांना आकृष्ट करण्यासाठी ह्या काही वर्तमानपत्रांची ही धडपड चालू आहे, हे उघड आहे. आणि असे हे प्रयोग चालू होऊन साधारणपणे दोन वर्षे होऊन गेली, तरी ते चालू आहेत, ह्याचाच अर्थ हा जो अधिकचा (इंक्रिमेंटल) वाचकवर्ग त्यांना मिळतो आहे, तो संख्येने भरपूर आहे. भास्कर व जागरण ह्या हिंदी वृत्तपत्रांना असे करावे लागत नाही. व जर 'चित्रलेखा' ,'जनशक्ति', 'मल्याळम मनोरमा', 'कल्कि' इत्यादिंनाही असे काहीही करायची जरूर पडत नसावी असे म्हटले, तर ते चुकीचे नसेल असे वाटते. हे सर्व हेच दर्शवते की मराठी भाषिकांना (विशेषतः मुंबई-पुण्याच्या) स्वतःलाच आपल्या भाषेची चाड नाही. माझे स्वतःचे निरिक्षण हेच आहे, व हेच तर सर्वसाक्षींनी अधोरेखित केले आहे. तेव्हा, हे असेच चालणार, ह्याला काही इलाज नाही.