प्रथम, अमुक करणे म्हणजे मूर्खपणा अशी टोकाची भाषा वापरुन आपण लोकांना दुखवू नये अशी माझी सूचना आहे.
    खाद्यपदार्थ, कपडे, अशा एखाद्या संस्कृतीचा भाग बनलेल्या गोष्टीचा अनुवाद करणे अवघड आहे हे खरे. पण वैज्ञानिकांनी शोधलेल्या गोष्टी ह्या विशिष्ट संस्कृतीपुरत्या मर्यादित नसतात. न्युटनने गुरुत्त्वाकर्षणाचा नियम शोधला म्हणून जर्मन लोकांनी त्या विषयाची इंग्रजी परिभाषा जशीच्या तशी स्वीकारली का? ऑक्सिजन, हायड्रोजन अशी मूलद्रव्ये युरोपातील कुठल्याकुठल्या लोकांनी शोधली पण प्रगत देशांनी ह्या गोष्टींना आपापल्या भाषेतील नावे दिली. क्ष किरण, टीव्ही ह्या गोष्टींना जर्मनमधे अगदी वेगळी नावे आहेत. मला वाटते अज्ञान, न्यूनगंड, कल्पनाशक्तीचा अभाव ह्या कारणाने नवी नावे रुढ होत नाहीत. पण एखादा प्रतिभावंत, कल्पक, मराठीचा अभिमानी नव्या शब्दांचे प्रयोग करत असेल तर त्याला मूर्ख ठरवणे जरा जास्तच होते आहे.
   स्वा. सावरकरांनी अनेक नवे मराठी शब्द निर्माण केले. सगळेच टिकले असे नाही पण वर्तमानपत्रातील विविध गोष्टींची मराठी परिभाषा आपण आज सहज वापरतो. जसे स्तंभ (कॉलम या अर्थी), संपादकीय, अग्रलेख. अन्य शब्द जसे, महापौर, महानगरपालिका, नगरसेवक, आमदार, खासदार, संसद हे सगळे तसे अगदी नवे शब्द आहेत. पण सोपेपणा, अर्थपूर्णता यामुळे हे शब्द मराठीत सहज रुळले आहेत. तशी तर लोकशाही ही कल्पना आपण आयातच केलेली आहे की.

जनित्र आणि रोहित्र अगदी खेडोपाडी वापरले जाणारे उपकरण आहे त्यामुळे ते शब्द रुळायला हरकत नाही.